बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील राणी चन्नम्मानगर, सेकंड स्टेज येथील जैन मंदिरापासून एअर फोर्स ग्राउंड कंपाऊंडपर्यंतच्या गेली 35 वर्षे विकासापासून वंचित असलेल्या रस्त्याचा तात्काळ विकास साधण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
राणी चन्नम्मानगर, सेकंड स्टेज येथील जैन मंदिरापासून एअर फोर्स ग्राउंड कंपाऊंडपर्यंतचा रस्ता गत 35 वर्षांहून अधिक काळ अविकसित राहिला आहे. या रस्त्यावर उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते.
याखेरीज रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव असून गटारांची सोय नाही. शहरात असून देखील लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अवस्था ग्रामीण दुर्गम भागातील कच्च्या रस्त्याप्रमाणे झाली आहे. परिणामी विशेष करून रात्रीच्या वेळी या रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांसाठी असुरक्षित परिस्थिती असते. सध्याच्या अवकाळी पावसामुळे तर या रस्त्याची वाताहत झाली आहे. परिसरातील रहिवाशांना गेल्या तीन दशकांपासून या रस्त्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागत आहे.
उच्च न्यायालयात गेल्या जानेवारी 2023 मध्ये झालेल्या एका खटल्याचा निकाल लागून आणि सदर रस्त्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने बेळगाव नगर विकास प्राधिकरणाला (बुडा) कारवाई करण्याचे निर्देश देऊनही, कोणतेही काम सुरू झालेले नाही. याबाबतीत बुडा आणि बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
यामुळे रस्त्याची दुर्दशा कायम असून स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. साधे रस्त्याचे विकास काम करून देण्यास इतका मोठा विलंब लावला जात असल्याबद्दल त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सदर रस्ता युद्धपातळीवर विकसित करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.





