बेळगाव लाईव्ह :मटका, पत्त्यांचा जुगार आणि अंमली पदार्थ गांजा विक्रीसह इतर बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी अलीकडे बेळगाव पोलिसांकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
याचाच भाग म्हणून मटका, पत्त्यांचा जुगार आणि गांजा विक्रीचे गैर कृत्य करून सातत्याने गुन्हे करणाऱ्या तिघा जणांना बेळगाव जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्यांची नावे सर्फराज शब्बीरअहमद शेख (रा. शहापूर बेळगाव), विनायक प्रकाश कोल्हापुरी (रा. अयोध्यानगर, टिळकवाडी बेळगाव) आणि सागर पांडुरंग सालगुडे (रा. होसुर बसवान गल्ली, शहापूर बेळगाव) अशी आहेत.
सातत्याने बेकायदेशीर कृत्यं करून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या या तिघांपैकी सर्फराज शेख याच्यावर अलीकडेच बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मटका जुगार, पत्त्याचा जुगार आणि इतर बेकायदेशीर कृत्यं केल्याबद्दल एकूण 16 गुन्हे नोंद झाले आहेत.
दुसरा आरोपी विनायक कोल्हापुरी याच्यावर गांजा विक्रीसह इतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी 5 गुन्हे तर, तिसरा आरोपी सागर सालगुडे यांच्यावर पत्त्याचा जुगार खेळण्यासह इतर अवैध प्रकार केल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल आहेत.

या तीनही आरोपींच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्नाटक पोलीस कायदा कलम 55 आणि 56 अन्वये उपरोक्त तिघाही आरोपींना तडीपार शिक्षा देण्यात आली आहे.
त्यानुसार तिघाही जणांना गेल्या मंगळवार दि. 17 मार्च 2026 पासून सहा महिन्यासाठी विजयपूर, कारवार आणि यादगिरी जिल्ह्यांमध्ये तडीपार करण्यात आले आहे.





