बेळगाव लाईव्ह :बेळगावातील एका वयस्कर व्यावसायिकाची तथाकथित ‘डिजिटल अरेस्ट’ नामक अत्याधुनिक सायबर गुन्ह्यात 15 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे वृत्त असल्याची माहिती पोलिसांनी आज शनिवारी दिली.
याप्रकरणी बेळगाव शहर सायबर, आर्थिक आणि अंमली पदार्थ (सीईएन) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाच्या प्राथमिक टप्प्यात अधिकाऱ्यांनी आरोपींशी संबंधित अनेक बँक खाती गोठवली असून ज्यामध्ये 90 लाख रुपये असलेल्या एका खात्याचाही समावेश आहे. ही रक्कम हडपलेल्या पैशाचा भाग असल्याचे मानले जाते. या फसवणुकीसाठी जबाबदार असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एक विशेष पथक तयार केले आहे.
तपास पथकाच्या मते, पीडित व्यक्तीशी अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तींनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. तसेच त्याला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात त्याचे बँक खाते चिन्हित (फ्लॅग) करण्यात आले आह असे खोटे सांगून कायदेशीर कारवाईची धमकी दिली. सध्या सुरू असलेल्या ‘तपासाच्या’ नावाखाली फसवणूक करणाऱ्यांनी त्या व्यावसायिकाला व्हेरिफिकेशन अर्थात सत्यापनासाठी अनेक बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडले.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पैसे परत केले जातील, असे आश्वासन त्याला देण्यात आले. भीती आणि दबावाखाली येऊन, पीडित व्यक्तीने अनेक बँक व्यवहार करून मोठी रक्कम हस्तांतरित केली आणि अखेरीस 15 कोटी रुपये गमावले.
डिजिटल अरेस्टचा कॉल आल्यास काय करावे. : घाबरू नये, फसवणूक करणारे घोटाळेबाज पीडितांवर दबाव आणण्यासाठी ‘अटक,’ ‘कायदेशीर कारवाई,’ किंवा ‘खाते गोठवणे’ यांसारख्या भीतीदायक युक्त्या वापरतात. ‘सत्यापनासाठी’ कधीही पैसे हस्तांतरित करू नका. कोणताही कायदेशीर अधिकारी तुम्हाला तपासासाठी दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगत नसतो. स्वतंत्रपणे पडताळणी करा.
कॉल डिस्कनेक्ट करा आणि तुमच्या बँकेशी किंवा पोलिसांशी अधिकृत क्रमांकांवरून संपर्क साधा. वैयक्तिक तपशील देणे टाळा. बँकेचा तपशील, ओटीपी, आधार किंवा पॅनची माहिती उघड करू नका. दबावाखाली असताना व्हिडिओ कॉलवर थांबू नका. ‘डिजिटल अरेस्टचे’ दावे खोटे असतात अशी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही.
तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा. तुमच्या बँकेला त्वरित कळवा. लवकर तक्रार केल्याने व्यवहार गोठवण्यास आणि पैसे परत मिळवण्यास मदत होऊ शकते. धमकी देऊन आणि बनावट ओळख वापरून व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या अशा मोठ्या रकमेच्या सायबर फसवणुकीत वाढ झाल्याचे नमूद करत पोलीस अधिकाऱ्यांनी वाढीव जनजागृतीच्या गरजेवर पुन्हा एकदा जोर दिला आहे.





