बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २२ जागांसाठी सुरू असलेल्या नोकरभरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवावी, या मागणीसाठी ‘मराठा बँक कृतीशील समिती’च्या वतीने आज सहकार संस्थांच्या जॉइंट रजिस्ट्रार यांची भेट घेण्यात आली.
यावेळी समितीचे समन्वयक अमित देसाई यांनी सांगितले की, बँकेच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मार्च निश्चित करण्यात आली आहे. मात्र, ३१ मार्च रोजी असलेली महावीर जयंतीची सुट्टी प्रशासकीय कारणास्तव ३० मार्च रोजीच जाहीर करण्यात आली आहे.
या अचानक बदललेल्या सुट्टीमुळे अनेक उमेदवारांना अर्ज सादर करताना अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन अर्जासाठी किमान एक दिवस तसेच शक्य असल्यास ४ ते ५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

दरम्यान, जॉइंट रजिस्ट्रार यांच्याशी झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समितीकडून सांगण्यात आले. तसेच, या भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
📌 समितीच्या प्रमुख मागण्या :
- संपूर्ण भरती प्रक्रिया (परीक्षा व मुलाखती) सीसीटीव्ही देखरेखीखाली पार पाडावी
- सर्व प्रक्रियेची योग्य नोंद व जतन करावे
- उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रक्रिया पारदर्शक ठेवावी
- संचालक, व्यवस्थापक किंवा अनधिकृत व्यक्तींचा हस्तक्षेप रोखावा
- भ्रष्टाचार रोखून गुणवत्ताधारित निवड प्रक्रिया सुनिश्चित करावी





