बेळगाव लाईव्ह : भाजपचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका करत सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप केला. बेळगाव येथील सरकारी विश्रामधाम (सर्किट हाऊस) येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विजयेंद्र म्हणाले की, राज्यातील गरीब जनता आणि शेतकरी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर समाधानी नाहीत. सत्तेवर येताना ज्या ‘अहिंदा’ (अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, दलित) घटकांना प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामध्ये प्रत्यक्षात फक्त अल्पसंख्यांक समुदायालाच झुकते माप दिले जात आहे. सत्तेवर आल्यानंतर मागासवर्गीय, दलित, अनुसूचित जाती-जमाती, वक्कलिग, लिंगायत आदी समाजघटकांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
अल्पसंख्यांक विकास निगमच्या वन-टाइम सेटलमेंट योजनेच्या निर्णयाला भाजपचा विरोध नसल्याचे स्पष्ट करत विजयेंद्र म्हणाले, मात्र इतर समाजघटकांवर अन्याय का केला जात आहे, हा खरा प्रश्न आहे. “मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर समाजांमध्येही गरीब लोक आहेत. या दुर्लक्षित घटकांकडे सरकार लक्ष का देत नाही? सवलती आणि विकासाच्या बाबतीत फक्त अल्पसंख्यांकांचाच विचार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गृहलक्ष्मी योजनेबाबत गंभीर आरोप करत विजयेंद्र म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी विधानसभेत ५ हजार कोटी रुपये लाभार्थी महिलांपर्यंत न पोहोचल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र आजपर्यंत त्या पैशांचा हिशेब नाही. “ते ५ हजार कोटी रुपये कुठे गेले? ते कुठे वळवले गेले आणि का? मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री याबाबत अजूनही उत्तर देऊ शकत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघासाठी विकास निधी मिळवताना अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. “विकास निधी देण्याऐवजी मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचवण्यात गुंतले आहेत. आमदारांना परदेश दौऱ्यावर पाठवून खुश केले जात आहे, पण प्रत्यक्ष विकास कामे रखडली आहेत,” असे ते म्हणाले.
शेवटी त्यांनी राज्य सरकारवर केंद्र सरकारवर दोष ढकलण्याची सवय असल्याचा आरोप केला. “कर्नाटकची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. राज्य कर्जबाजारी होण्याच्या दिशेने जात असून याला संपूर्णपणे राज्य सरकारचे अपयश जबाबदार आहे,” असे विजयेंद्र यांनी ठणकावून सांगितले.




