बेळगाव लाईव्ह: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा आर्थिक वाढ, वित्तीय शिस्त आणि विविध क्षेत्रांना चालना देणारा असल्याचे मत बेळगाव क्लॉथ, सिल्क अँड टेक्स्टाईल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच ट्रेडर्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी व्यक्त केले आहे.
या अर्थसंकल्पात सार्वजनिक भांडवली खर्चात वाढ करून पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून, त्यामुळे उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक, व्यवसायातील विश्वास आणि रोजगारनिर्मितीस चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
विशेषतः उत्पादन क्षेत्र आणि एमएसएमई उद्योगांना बळकटी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजना, इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 तसेच लघुउद्योगांसाठी वाढवलेले कर्ज सहाय्य हे स्वागतार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे भारतीय उद्योग जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम होतील.
कापड, वस्त्र व रेशीम उद्योगासाठी टेक्स्टाईल क्लस्टर आधुनिकीकरण, रोजगारवाढ आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी जाहीर केलेल्या योजनांमुळे या क्षेत्राला नवे बळ मिळेल, असेही तेंडुलकर म्हणाले.

रेल्वे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे बोलताना त्यांनी पायाभूत सुविधा व मालवाहतूक यावर सरकारने दिलेल्या भराचे स्वागत केले. मुंबई-पुणे यासह ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर करण्यात आले हे सकारात्मक असले तरी, दक्षिण रेल्वे विभाग आणि विशेषतः हुबळी रेल्वे झोन अंतर्गत येणाऱ्या बेळगावला कोणताही ठोस लाभ मिळाला नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एकूणच हा अर्थसंकल्प शाश्वत विकास, उद्योगवृद्धी आणि समावेशक प्रगतीसाठी मजबूत पाया घालणारा असून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम येत्या काळात जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार स्पष्ट होतील, असे मत सतीश तेंडुलकर यांनी व्यक्त केले आहे.



