belgaum

पुणे सायबर पोलिसांकडून बेळगावचे दोघे अटकेत

0
1034
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुणे सायबर पोलिसांनी हडपसर येथील एका बांधकाम कंपनीची तब्बल १.९५ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी बेळगावातील दोघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे अजय रामविलास यादव (२२, रा. लक्ष्मी नगर, काकती) आणि सलमान गौस मोईनुद्दीन अज्नल (३२, रा. झटपट कॉलनी, अंगोल) अशी आहेत. दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

पुणे सायबर पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १९ जानेवारी रोजी नोंदविण्यात आली. हडपसर येथील एका बांधकाम कंपनीने उपकरणांच्या खरेदीसाठी १.९५ कोटी रुपये पुरवठादाराला वर्ग करणे अपेक्षित होते. मात्र कंपनीला मूळ पुरवठादाराच्या ई-मेल आयडीसारखाच दिसणारा, परंतु बँक खात्याची माहिती बदललेला बनावट ई-मेल प्राप्त झाला.

खात्याची माहिती प्रत्यक्ष पुरवठादाराकडून पडताळणी न करता कंपनीने संबंधित रक्कम फसव्या खात्यात वर्ग केली.

 belgaum

तपासादरम्यान पोलिसांनी पैशांचा मागोवा घेतला असता ही रक्कम बेळगाव येथील ‘श्री कन्नया एंटरप्रायझेस’शी संबंधित ॲक्सिस बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते अजय यादव याचे असून तो वडिलांसोबत हार्डवेअर व्यवसाय चालवितो.

पोलिसांच्या तपासात यादव याने व्यवहारांवर कमिशन देण्याच्या आमिषाने आपली बँक खात्याची माहिती सलमान अज्नल याला दिल्याचे उघड झाले. अज्नल हा स्थानिक गॅरेजमध्ये काम करतो. डिजिटल व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, ॲक्सिस बँकेची पासबुक व डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर फसवणुकीच्या या जाळ्यातील इतर सूत्रधार व संबंधितांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.