बेळगाव लाईव्ह -“अनंतराव जांगळे यांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे म्हणूनच त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित करावे त्यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करीन” असे विचार माजी आमदार गुरुवर्य परशुराम भाऊ नंदीहळळी यांनी बोलताना व्यक्त केले.
नाट्यकर्मी अनंतराव जांगळे यांचे गेल्या 23 फेब्रुवारी रोजी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल गुरुवारी सायंकाळी हिंदवाडी येथील हिंद हाउसिंग सोसायटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य नंदीहळी होते हे होते.
गुरुवर्य नंदीहळी आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते अनंतराव जांगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अनंतराव जांगळे यांनी ज्या विविध संस्थांमध्ये कार्य केले त्या संस्थांचे प्रतिनिधी या शोक सभेस उपस्थित होते. व्यासपीठावर पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, दैवज्ञ बँकेचे उपाध्यक्ष मंजुनाथ शेठ ,तुकाराम बँक व मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, हिंद सोशल क्लबचे संगोळी आणि आनंदवाडी चे पंच शशिकांत रणदिवे आदी उपस्थित होते.
अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून जांगळे यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर अनेकांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
जायंट्स सखीच्या अध्यक्ष सुलक्षणा शिरोळकर, बसवेश्वर बँकेच्या संचालिका सरला हेरेकर, मराठा समाज सुधारणा मंडळाचे शिवराज पाटील, संजीवनी फाउंडेशन चे मदन बामणे, शहापूर मुक्तिधाम चे श्रीकांत काकतीकर, जायंट्स ग्रुपचे डॉ.विनोद गायकवाड, ईश्वर लगाडे आदींनी आपल्या भावना व्यक्त करून जांगळे यांना श्रद्धांजली वाहिली.
“अनंतराव जांगळे हे मितभाषी असलेले उत्तम कार्यकर्ते होते. जायंट्स ग्रुपच्या सर्व कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी सहकार्य केले” असे लक्ष्मण शिंदे म्हणाले.”शांत स्वभावाचे ,नेहमी हसत खेळत काम करणारे आणि हिंद सोशल क्लब व स्पोर्ट्स क्लब मध्ये कायम कार्यरत राहणारे जांगळे यांचे निधन झाल्याने आम्ही एका उत्तम कार्यकर्त्यास मुकलो आहोत “असे विचार मंजुनाथ शेठ यांनी व्यक्त केले.
“आनंदवाडी नागरिकांच्या पाठीशी नेहमी राहणारे सामाजिक कार्यकर्ते जांगळे यांच्या निधनाने शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका कार्यकर्त्यास आम्ही मुकलो आहोत” अशी भूमिका शशिकांत रणदिवे यांनी व्यक्त केली.”अनंतराव हे अजातशत्रू व होते सार्वजनिक वाचनालय आणि मराठा समाज सुधारणा मंडळात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे” असे नेताजी जाधव म्हणाले.
” अनंतराव जांगळे यांचे माझ्याशी संबंध 1995 पासून आले त्यानंतर आम्ही तुकाराम बँकेत डायरेक्टर म्हणून गेलो. गेली 25 वर्षे त्यांच्याबरोबर काम करताना कधीही ते गैर वागले नाहीत. स्कूल ऑफ कल्चर मध्ये झालेली सगळी नाटके व कार्यक्रम ही अनंतराव जांगळे यांच्या कार्याची पोचपावती आहे” असे मत प्रकाश मरगळे यांनी व्यक्त केले.
जांगळे यांच्या स्नु शा अमृता अभिजीत जांगळे यांनी अनंतरावांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.” त्यांनी आम्हाला कधीही सून म्हणून वागणूक दिली नाही मुलगी म्हणूनच आपुलकीची वागणूक दिली, वडिलांचे प्रेम दिले, त्यांचा मोठा आधार आम्हाला होता. ” असे त्या म्हणाल्या.
सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून जांगळे यांचे चिरंजीव अभिजीत यांनी वडिलांची राहिलेली स्वप्ने आम्ही पूर्ण करू, त्यांचे सामाजिक कार्य असेच पुढे चालू ठेवू .असे मत व्यक्त केले.
दोन मिनिटे शांतता पाळून स्वर्गीय अनंतराव जांगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जायंट्स ग्रुप, तुकाराम बँक, सार्वजनिक वाचनालय, हिंद हौसिंग सोसायटी, आनंदवाडी नागरिक संघटना, अतुल पुरोहित, राजेंद्र मुंदडा, मोहन पवार,यांच्यासह जांगळे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व उपस्थितानी फुले अर्पण करून जांगळे यांना श्रद्धांजली वाहिली.




