belgaum

शेकडो झाडांची बेकायदा कत्तल; कारवाईची मागणी

0
638
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील बडाला अंकली येथील इतिहास प्रसिद्ध क्वारी गुड्ड प्रदेशातील शेकडो झाडे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे समजते. महसूल खात्यासह वनखात्याची कोणतीही रीतसर परवानगी न घेता हा गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप आहे.

कत्तल करण्यात आलेल्या झाडांमध्ये चंदन, सागवान, चिंच, बाभूळ वगैरेंसह विविध झाडांसह अन्य परोपकारी झाडे आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे. बडाल अंकली गावाजवळील सुमारे 40 एकर प्रदेशात सोलार प्लांट उभारण्यासाठी महसूल खात्याशी इंधन खात्याचा दीर्घ मुदतीचा करार झाला असून त्या अनुषंगानेच शेकडो झाडे बेकायदेशीररित्या जेसीबीच्या सहाय्याने मुळापासून उखडून टाकण्यात आल्याचा आरोप आहे.

सदर बेकायदेशीर प्रकारामुळे क्वारी गुड्डच्या सुमारे 50 एकर प्रदेशातील झाडांची हिरवळ नष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे या सुमारे 500 एकर जंगल प्रदेशातील वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट झाला असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सोलार प्लांटच्या नावाखाली इतिहास प्रसिद्ध क्वारी गुड्ड अरण्य प्रदेशातील सुमारे 50 एकर पेक्षा जास्त प्रदेशातील उभी असलेली झाडे उध्वस्त करण्यात आली असून याला महसूल खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

 belgaum

त्याचप्रमाणे संबंधित झाडे तोडण्याची परवानगी कोणी दिली? कोणाला विचारून झाडांची कत्तल करण्यात आली? असा संतप्त सवालही केला जात आहे. तथापि हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. दुसरीकडे झाडांची ही कत्तल मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सहमतीने झाली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

तसेच यासंदर्भात तहसीलदार आणि वनखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. सदर बेकादेशीर प्रकार हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.