बेळगाव लाईव्ह : बेळगावातील महिला अधिकाऱ्याच्या घरात गुप्त कॅमेरा बसवून त्यांचे खासगी क्षण टिपणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीचे आणखी एक भीषण कृत्य उघडकीस आले आहे. या प्रकरणाच्या तपासात माळमारुती पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिस्टोर केला असता, त्यामध्ये १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ फाईल्सचा साठा सापडला असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
या टोळीने एका जिल्हास्तरीय महिला अधिकाऱ्याच्या घरातील विद्युत बल्बच्या होल्डरमध्ये अतिशय सूक्ष्म कॅमेरा लपवला होता. या माध्यमातून टिपलेल्या खासगी व्हिडिओचा वापर करून आरोपींनी ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास आक्षेपार्ह चित्रण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन या तोतया पत्रकारांनी महिला अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले समीर शेख, अब्दुल रशीद मकानदार आणि मोहम्मद बाळेकुंद्री या तिघांच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नराधमांनी केवळ एकाच नव्हे, तर आणखी एका महिला अधिकाऱ्याचेही अशाच प्रकारे खासगी व्हिडिओ चित्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासादरम्यान आरोपींनी अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याची कबुली दिली असून, या रॅकेटचे जाळे प्रशासकीय वर्तुळात किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, माळमारुती पोलिसांनी तिन्ही आरोपींना पुन्हा कोठडीत घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.




