belgaum

बाजारपेठेतील कचऱ्याची उचल सायंकाळनंतर करण्याची मागणी

0
178
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेंगलोर, मुंबई वगैरे महानगरांच्या धर्तीवर बेळगाव महापालिकेने शहरातील बाजारपेठेमध्ये असलेली दुकानं, हॉटेल्स, कोल्ड्रिंक हाऊस आणि मोठ्या आस्थापनांमधील कचऱ्याची उचल करण्याची व्यवस्था सकाळच्या ऐवजी दररोज सायंकाळनंतर करावी, अशी जोरदार मागणी व्यापारी व दुकानदारांकडून केली जात आहे.

बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून दररोज सकाळी लवकर शहराच्या बाजारपेठेतील दुकानं, हॉटेल्स, कोल्ड्रिंक हाऊस व मोठ्या आस्थापनांच्या कचऱ्याची उचल केली जाते. सर्वसामान्यपणे शहराची बाजारपेठ सकाळी 10 ते 10:30 नंतर उघडते, तत्पूर्वी दुकानं व आस्थापनांची झाडलोट करून कचरा संग्रहित करून ठेवला जातो. तथापि महापालिकेची कचरागाडी सकाळी लवकर येऊन गेली असल्यामुळे संग्रहित करून ठेवलेल्या त्या कचऱ्याची उचलच होत नाही. परिणामी तो कचरा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत संबंधित दुकानं व आस्थापनांसमोर तसाच पडून रहात असल्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असते. त्यासाठी आपल्याकडील कचऱ्याची उचल सकाळच्या ऐवजी सायंकाळनंतर रात्री 9 वाजेपर्यंत केली जावी, अशी जोरदार मागणी दुकानदार व व्यापारीवर्गाकडून केली जात आहे.

यासंदर्भात बेळगाव लाईव्हसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना किर्लोस्कर रोड येथील एक व्यापारी शिवाजी हंडे यांनी सांगितले की, बेळगाव शहरातील व्यावसायिक दुकाने आस्थापणे असलेल्या किर्लोस्कर रोड मारुती गल्ली रामदेव गल्ली खडेबाजार, गणपत गल्ली वगैरेंसारख्या रस्त्यांवर अलीकडे कचऱ्याची समस्या भेडसावू लागली आहे. याचे मूळ कारण आहे की ज्यावेळी या ठिकाणी सकाळी लवकर महापालिकेच्या कचरागाड्या कचऱ्याची उचल करण्यास येतात त्यावेळी व्यापारी हजर नसतात. याचे देखील कारण असे आहे की शहरातील बाजारपेठ खऱ्या अर्थाने सकाळी 10:30 नंतर उघडते आणि त्यानंतर व्यापाराला सुरुवात होते. त्यामुळे दुकाने, आस्थापनांमधील कचरा त्यांच्याकडेच पडून राहतो. परिणामी दुकानदार, व्यापाऱ्यांसाठी ही फार मोठी समस्या झाली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी विनंत्या केल्या आहेत. बाजारपेठेच्या परिसरात सकाळच्या ऐवजी कृपया सायंकाळनंतर कचऱ्याची उचल करण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांना केली आहे. तसेच दररोज सायंकाळी 6 -6:30 वाजल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत आपण जर कचऱ्याची उचल केली तर व्यापारी अथवा दुकानदार व त्यांचे कामगारांच्या उपस्थितीत कचऱ्याची उचल अधिक प्रभावीपणे होईल, हे संबंधित अधिकाऱ्यांना पटवून दिले आहे. मात्र दुर्दैवाने आजपर्यंत त्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आज बंगलोर, मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमधून रात्रीच्या वेळीच बाजारपेठेतील कचऱ्याची उचल करून विल्हेवाट लावली जाते. तेंव्हा त्या पद्धतीची सोय जर बेळगाव महापालिकेने केली तर ती व्यापारी दुकानदारांसाठी अनुकूल ठरेल आणि शहराची स्वच्छता अधिक प्रभावीपणे कायम ठेवण्यात व्यापाऱ्यांचाही हातभार लागेल, असे सांगून प्रशासन या सूचनेची योग्य ती दखल घेईल याची मला खात्री आहे, असे मत शिवाजी हंडे यांनी व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.