बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर शिवारात पिकाऊ शेतातून उच्च दाबाच्या वीज वाहिन्या नेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा मोबदला न देता मोठमोठे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी रब्बी पिकांचे नुकसान करून खड्डे खोदण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला असता, भरपाईचे आश्वासन देऊन काँक्रिटीकरण करण्यात आले, मात्र यावर्षी पुन्हा पिकांचा पूर्णत: फडशा पाडत खांब उभारले जात आहेत.
यरमाळ रस्त्याला लागून असलेल्या शहापूर शिवारात बळीराम कुंडेकर या वृद्ध शेतकऱ्याच्या शेतातील मोहरी, मसूर, वाटाणा आणि हरभरा ही पिके नष्ट करून खांब उभे करण्यात आले. यावेळी कंत्राटदाराने संबंधित शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा प्रकारही समोर आला आहे.
नियमानुसार संबंधित विभागाकडून नुकसान भरपाई आणि खांबाचे मासिक भाडे मिळणे अपेक्षित असताना, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांची लूट केली जात असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे.

रब्बी पिकांमधून अनियंत्रितपणे यंत्रसामग्री आणि वाहने नेल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. कष्टाने वाढवलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांनी तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले आहे.
याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी येळ्ळूर परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.




