belgaum

मिरापूरगल्लीतील रहिवाशी का झालेत संतप्त

0
352
 belgaum

बेळगाव लाईव्ह : ड्रेनेज अर्थात भुयारी गटार व्यवस्था सदोष असल्यामुळे मिरापूर गल्ली शहापूर येथील विहिरींचे पाणी दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याबद्दल नागरिकांमध्ये स्थानिक नगरसेवक व महापालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिरापूर गल्ली, शहापूर येथील भंगी बोळातील भुयारी गटार (ड्रेनेज लाईन) सध्या मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. सदर ड्रेनेजेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे त्याला गळती लागून जमिनीत झिरपलेले सांडपाणी आजूबाजूच्या विहिरींमध्ये जाऊन मिसळत आहे. त्यामुळे या परिसरातील विहिरी दूषित झाल्या आहेत. अलीकडे सातत्याने उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मीरापूर गल्लीच्या या भागातील रहिवाशांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

अशा परिस्थितीत महापालिकेच्या सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे येथील विहिरींमधील पाणी दूषित झाले आहे. मिरापूर गल्ली, भंगी बोळातील या ड्रेनेज तुंबण्याच्या समस्येस जवळचे एक अपार्टमेंट कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

या अपार्टमेंटमधील नागरिक आपला घरगुती केरकचरा ड्रेनेज चेंबरमध्ये टाकत असल्यामुळे ही समस्या वारंवार उद्भवत आहे, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच स्थानिक नगरसेवक आश्वासन देण्यापलीकडे काहीही करत नसल्याबद्दल रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. निर्माण झालेल्या समस्येत भर म्हणून शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीने पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन घालण्यासाठी या ड्रेनेज चेंबरला लागूनच खोदकाम केल्यामुळे स्थानिक रहिवासी हैरान झाले असून आता नळाचे पाणी देखील प्रदूषित होणार या भीतीने ते चिंताक्रांत बनले आहे.

दुसरीकडे पाणी टंचाईचे सावट आणि उन्हाळा जवळ येत असताना या पद्धतीने महापालिका प्रशासनाकडून विहिरींसारख्या नैसर्गिक जलस्तोत्रांच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविला जात असल्याबद्दल जाणकार नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

भंगीबोळातील ड्रेनेज पाईपलाईन तुंबण्याबरोबरच नादुरुस्त झाल्यामुळे आमच्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. याबद्दल वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. शहरातील नैसर्गिक जलस्तोत्र सुरक्षित, स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आम्ही स्वतःच स्वखर्चाने आमच्या विहिरींचे पाणी औषध टाकून निर्जंतुक करत असतो.

तथापी अलीकडे दर पंधरा दिवसांनी विहिरींचे पाणी दूषित होत असून पाण्याला घाणेरडा फेस येत आहे. आमची समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी तर सोडाच खुद्द स्थानिक नगरसेवक धोंगडी हे देखील आमच्या गल्लीत फिरकत नाहीत, असे खेदाने सांगून तुंबणारे ड्रेनेज आणि दूषित होणाऱ्या विहिरींच्या समस्येचे महापालिकेने लवकरात लवकर निवारण करावे, अशी मागणी मिरापूर गल्ली येथील गृहिणींनी बेळगाव लाईव्हशी बोलताना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.