बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील सिटी सेंट्रल लायब्ररी अर्थात सरकारी केंद्र ग्रंथालयाच्या स्वच्छतागृहात साप शिरल्यामुळे भीतीने धावपळ उडाल्याची घटना आज घडली. तथापि त्या सापाला सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
शहरातील सरकारी केंद्र ग्रंथालयातील स्वच्छतागृहाच्या दरवाजावर आज गुरुवारी एक साप आढळून आला. त्यामुळे भीतीने शांततापूर्ण वातावरण असलेल्या लायब्ररीमध्ये एकच धावपळ उडाली. त्यावेळी प्रसंगावधान राखून ग्रंथालय प्रमुखांनी येळ्ळूर येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र आनंद चिट्टी यांच्याशी संपर्क साधून सापाबद्दल माहिती दिली.
तेंव्हा लागलीच ग्रंथालयाकडे धाव घेतलेल्या आनंद यांनी स्वच्छतागृहाच्या दारावर अडकलेल्या सापाला शिताफीने अलगद पकडून आपल्या ताब्यात घेतले.

त्याचप्रमाणे पकडलेल्या सापाची माहिती देऊन त्यांनी सापाबद्दलचे गैरसमज दूर केले. त्रास दिल्याशिवाय साप विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाही. मुळात विषारी सापांच्या जाती खूप कमी आहेत. तथापि सर्पदंषानंतर साप बिन विषारी असूनही भीतीमुळे मृत्यू ओढवतो. तेंव्हा शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सापाबद्दलची भीती आपण मनातून दूर केली पाहिजे.
सापापेक्षा आजकालची गुटखा, तंबाखू, दारू वगैरेंची जीवघेणी व्यसने, पाश्चात्य आहार पद्धती आपल्यासाठी अधिक धोकादायक आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी केंद्र ग्रंथालयातील कर्मचारी वर्ग आणि वाचकांसमोर बोलताना सांगितले.





