belgaum

जय किसान, स्थायी समिती, स्मार्ट सिटी निधीवरून विचारला जाब

0
215
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव महानगरपालिकेतील प्रलंबित प्रश्न, विकासकामांचा रखडलेला निधी आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून आज सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

बेळगाव शहरातील सर्वेक्षण क्रमांक ६७७, ६७८, ६८६/१, ६८६/२, ६९६/१, ६९७/२, ६९८/१ आणि ६९८/२ मधील जमिनींवरील बांधकाम परवानग्यांबाबत महानगरपालिकेच्या कर आणि वित्त स्थायी समितीने २१ जानेवारी २०१९ रोजी दिलेला आदेश तातडीने रद्द करावा, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल केएमसी कायद्याच्या कलम ९८ नुसार तातडीने शासनाला सादर करणे बंधनकारक असतानाही महानगरपालिका प्रशासनाकडून यावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या प्रशासकीय दिरंगाईमुळे संताप व्यक्त केला जात असून, लक्ष्मण शंकर चौगुले यांनी याविरोधात महानगरपालिका आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

दुसरीकडे, जय किसान भाजी मार्केटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्केटची अधिकृत परवानगी रद्द होऊन आता नऊ महिने उलटले आहेत. असे असतानाही या ठिकाणी अद्याप अनधिकृतपणे बाजार भरवला जात असून व्यवहार सुरूच आहेत. एपीएमसी भाजी मार्केट असोसिएशनने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले हे मार्केट तातडीने बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पालाही प्रशासकीय अनास्थेचा फटका बसला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगावसाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु त्यापैकी केवळ ७५ कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. उर्वरित निधी मिळवण्यासाठी महानगरपालिकेने आपल्या वाट्याची २० टक्के रक्कम ३१ मार्चपूर्वी जमा करणे आवश्यक आहे. जर ही रक्कम वेळेत भरली गेली नाही, तर केंद्र सरकारचा कोट्यवधींचा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर विषयावर सामाजिक कार्यकर्त्यांनी स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता यांची भेट घेऊन जाब विचारला असता, प्रशासकीय स्तरावरील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत.

सत्ताधारी भाजप नगरसेवकांना विकासकामे राबवण्यात पूर्णपणे अपयश आले असून निधीचा योग्य विनियोग न झाल्यामुळेच आज बेळगावचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे, अशी टीका सुजित मुळगुंद यांनी केली.

महानगरपालिका प्रशासनाने या सर्व गंभीर मुद्द्यांवर तातडीने तोडगा काढून शहराचे हित जोपासावे, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी प्रतिक्रिया राजकुमार टोपन्नावर यांनी व्यक्त केली.

महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहराचे मोठे आर्थिक आणि वैधानिक नुकसान होत असल्याचा आरोप करत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यात आला नाही तर आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.