बेळगाव लाईव्ह : बाळेकुंद्री खुर्द येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवराज अनंतराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने संपूर्ण बाळेकुंद्री खुर्द परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज श्री. पुंडलिक महाराज देहूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भजन–कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या सुमधुर वाणीतून सादर झालेल्या अभंग-भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज हभप एकनाथ तुळसीदास नामदास (पंढरपूर) तसेच संत कबीर महाराजांचे वंशज हभप रघुनाथ सदाशिव महाराज कबीर यांचीही विशेष उपस्थिती लाभली. संतपरंपरेतील या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

प्रारंभी मातोश्री शशिकला जाधव, हभप पुंडलिक महाराज देहूकर, हभप एकनाथ तुळसीदास नामदास व हभप रघुनाथ सदाशिव महाराज कबीर यांची जाधव परिवाराच्यावतीने पाद्यपूजा करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास बाळेकुंद्री, सांबरा, मुतगा, बसरीकट्टी, निलजी, बसवणकुडची, मोदगा, सुळेभावी आदी भागांतून वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरणात शिवराज जाधव यांचा वाढदिवस साजरा होत असताना समाजात सद्भावना व एकोप्याचा संदेश देण्यात आला.
ग्रामस्थ व वारकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत जाधव यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच शिवराज जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.





