बेळगाव लाईव्ह :जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा जयघोषात सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शामाप्रसाद मुखर्जी रोड, शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आयोजित या श्री शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी सकल मराठा समाज बेळगावचे समन्वयक किरण जाधव व अन्य मान्यवरांच्या हस्ते उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी यावेळी उपस्थित सर्वांनी शिवरायांना अभिवादन करण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव असा जयघोष करून उद्यानाचा परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी बोलताना किरण जाधव यांनी सर्वप्रथम शहरवासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सालाबाद प्रमाणे तारखेनुसार आज 19 फेब्रुवारी रोजी आपण आपल्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय व सार्वजनिकरित्या साजरी करत आहोत. आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज हे एक असे राजे होऊन गेले की आज 394 वर्षे झाली त्यांच्यासारखा युगपुरुष होणे नाही. ते आमचे आराध्य दैवत आहेत.
प्रशासनाला आठ दिवसांपूर्वी आम्ही विनंती केली होती की शिवजयंतीचे जे कांही कार्यक्रम आहेत, ते प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर करावेत. जेणेकरून मराठा समाज त्यामध्ये सहभागी होईल. बेळगावसह उत्तर कर्नाटकात मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे त्याला विश्वासात घेणे आवश्यक होते. तथापि दुर्दैवाने प्रशासनाकडून तसे झाले नसले तरी पुढच्या वेळी संपूर्ण मराठा समाजाला विश्वासात घेऊन भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी कालच मला दिली आहे असे सांगून समस्त बेळगावकरांनी आजचा शिवजयंती उत्सव एक सण म्हणून साजरा करावा, असे आवाहन किरण जाधव यांनी केले.

सकल मराठा समाजाचे अन्य एक नेते साहित्यिक गुणवंत पाटील यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना शिवजयंती ही फक्त एका दिवसाची नसून वर्षभराची असते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जीवनशैली आणि एकंदर जगण्याची जी पद्धत होती ती आपण वर्षभर आचरण्यासारखी आहे, असे सांगितले. माणसाला चांगलं काही शिकण्यासाठी तसे चांगले आदर्श समोर असावे लागतात. याबाबतीत मराठा समाजासमोर छत्रपती शिवरायांचा आदर्श नेहमीच उपलब्ध असताना आपल्याला इतर कोणत्या गोष्टीकडे बघण्याची गरजच नाही. कोणत्याही संकटावर कशी मात करावी? आपले राज्य कसे उभे करावे? आपला समाज कसा घडवावा? समाजाच्या प्रत्येक घटकाला कसे आपल्या सोबत सामावून घ्यावे आणि त्यासाठी जे जे करावे लागते ते कसे करावे हे शिकवणारी जीवन पद्धती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकंदर जीवन चरित्र आहे असे पाटील यांनी स्पष्ट केले. शिवचरित्रातून आजच्या अबालवृद्धांना शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. ज्यांच्यामुळे आपल्याला जीवनात यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात शिवचरित्र हे असलेच पाहिजे असे सांगून गुणवंत पाटील यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या महिला नेत्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यासह इतर मान्यवरांनी समायोचित विचार व्यक्त करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सकल मराठा समाजाचे नेते ॲड. अमर येळ्ळूरकर, महादेव पाटील, सुनील जाधव आदींसह मराठा समाज बंधू -भगिनी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



