बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी येथे कौटुंबिक वादाचा वणवा पेटला असून, सांगलीतील एका कुटुंबावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून झालेल्या यातालुक्यातील बेनकनहळ्ळी येथे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री दोन गटांत भीषण हाणामारी झाली. सांगली आणि परिसरातील एका तरुणांच्या टोळीने बेनकनहळ्ळीतील साळुंखे कुटुंबाच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी तत्परता दाखवत सात आरोपींना अटक केली आहे. उर्वरित पाच फरार आरोपींचा शोध सुरू असून, पोलीस आयुक्तांनी हल्लेखोरांवर ‘रौडीशीटर’ कायद्यांतर्गत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
या घटनेची पाळेमुळे अविनाश साळुंखे आणि त्यांचे मेहुणे दीपक यांच्यातील जुन्या कौटुंबिक वादात दडलेली आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी झालेली तडजोड निष्फळ ठरली होती. याचाच राग मनात धरून सोमवारी रात्री सांगली, मुचंडी आणि मुत्यानट्टी येथील अंदाजे १२ तरुणांच्या टोळक्याने बेनकनहळ्ळीत बेकायदेशीर प्रवेश केला. या टोळक्याने थेट साळुंखे यांच्या घरात शिरून शस्त्रांच्या सहाय्याने हल्ला चढवला.
हल्ल्याचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी ग्रामस्थांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त गावकऱ्यांनी या टोळक्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. वाढता जनक्षोभ पाहून हल्लेखोरांनी स्वतःची चारचाकी वाहन आणि दुचाकी घटनास्थळीच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या मारहाणीत अविनाश साळुंखे, बालाजी साळुंखे आणि मीना नाईक हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत. आयुक्तांनी स्पष्ट केले की, “गावाची शांतता भंग करणाऱ्या आणि बाहेरून येऊन दहशत माजवणाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही. सखोल तपासानंतर सर्व वस्तुस्थिती समोर येईल.”
या घटनेमुळे बेनकनहळ्ळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बाहेरून येणाऱ्या समाजकंटकांवर कायमस्वरूपी जरब बसवण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.



