बेळगाव लाईव्ह :देशात एकीकडे T -20 विश्वकपची धूम सुरू असताना बेळगावच्या क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या सरदार मैदानावर टेनिस बॉल क्रिकेटचा महा संग्राम सुरू होणार आहे.
बेळगावच्या क्रिकेटप्रेमींची वाढती मागणी, त्याचबरोबर बेळगावच्या होतकरू क्रिकेटपटूंना त्यांच्यातील कौशल्याला स्पर्धात्मक प्रोत्साहन मिळावे आणि ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत, या उद्देशाने ‘श्री मुरगेंद्रगौडा एस. पाटील करंडक -2026’ पहिल्या सत्रातील अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन एम.पी. फाउंडेशन भाजप नेते ॲड. मुरगेंद्रगौडा एस. पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
बेळगावातील टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार मैदानावर बेळगाव लाईव्हशी खास संवाद साधताना ॲड. मुरगेंद्रगौडा म्हणाले की बेळगाव शहरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची लोकप्रियता मोठी आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक क्रिकेट शौकिनांना दर्जेदार टेनिस बॉल क्रिकेट पाहता यावे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील मातब्बर क्रिकेटपटून सोबत खेळून आपले बेळगावचे स्थानिक क्रिकेटपटू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावेत या उद्देशाने सरदार मैदानावर सध्या श्री मुरगेंद्रगौडा एस. पाटील करंडक -2026 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीशी बोलताना ॲड. मुरगेंद्रगौडा एस. पाटील यांनी सांगितले की, बेळगावकरांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि येथील खेळाडू देखील दर्जेदार आहेत. तसेच सरदार ग्राउंड म्हणजे क्रिकेट असे समीकरण आहे त्यामुळे आम्ही आमची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आमच्या या स्पर्धेची बक्षीस रक्कम आत्तापर्यंतच्या बेळगाव येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील सर्वाधिक रक्कम आहे याचे कारण म्हणजे या स्पर्धेत महाराष्ट्र तमिळनाडू वगैरे देशाच्या विविध राज्यातील मातब्बर खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत हे खेळाडू आयएसपीएल सारख्या राष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळलेले आहेत.

तेंव्हा स्पर्धेची बक्षिस रक्कम ही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या योग्यतेची असावी याची काळजी आम्ही आमच्या परीने घेतली आहे. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा व्हावी हा समस्त क्रिकेटप्रेमींचा आग्रह आणि बेळगावच्या होतकरू क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही आमच्या एम. पी. फाउंडेशनतर्फे पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करत आहोत सांगून आमच्या या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सरदार मैदानावर सर्वसामान्य प्रेक्षक गॅलरीसह खास क्रिकेटप्रेमी महिला व युवतींसाठी स्वतंत्र प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे. अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद पटकावले. या पार्श्वभूमीवर स्थानिक उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंना अभ्यास करता यावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि क्रिकेटप्रेमी महिलांना क्रिकेटचा आनंद लुटता यावा हा महिलांसाठी स्वतंत्र प्रेक्षक गॅलरी उभारण्याचा उद्देश आहे, अशी माहिती ॲड. मुरगेंद्रगौडा पाटील यांनी दिली.
स्पर्धेच्या आयोजक समितीचे सदस्य असलेल्या श्रीनिवास बिसनकोप्प यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, मुरुगेंद्रगौडा पाटील करंडक क्रिकेट स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही बेळगाव मधील आत्तापर्यंतची सर्वात मोठ्या बक्षीस रकमेची स्पर्धा आहे, असे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात गल्ली-बोळात टेनिस बॉल क्रिकेट खेळले जाते. जशी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला आयपीएलमुळे झळाळी आली, तशी भारतामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) नावाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमुळे टेनिस बॉल क्रिकेटला हळूहळू झळाळी येऊ लागली आहे.
या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील मातब्बर खेळाडू जे विदेशातही खेळतात त्यांचा सहभाग असतो. ते आयएसपीएल खेळाडू मुरुगेंद्रगौडा पाटील करंडक क्रिकेट क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बेळगावात येत आहेत. ज्यामध्ये कृष्णा सातपुते, अयाज यांच्यासारखे जवळपास 14 ते 15 आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंचा समावेश असून जे वेगवेगळ्या संघातून खेळण्यासाठी बेळगावमध्ये येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबरीने खेळण्याची आणि स्पर्धा करण्याची संधी बेळगावच्या स्थानिक क्रिकेटपटूंना मिळणार आहे. एकंदर बेळगावच्या होतकरू क्रिकेटपटूंना, त्यांच्यातील कौशल्याला स्पर्धात्मक प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा असणार असून ज्यामुळे स्थानिक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, असे मत श्रीनिवास यांनी व्यक्त केले.




