belgaum

मिरचीचा तडका महागला!

0
931
 belgaum


बेळगाव लाईव्ह : सध्या लग्नसराई आणि यात्रांचा हंगाम जोरात सुरू असतानाच स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मिरचीने सर्वसामान्यांना रडवले आहे.

हुबळी, हावेरी यासह विविध ग्रामीण भागातून बाजारपेठेत मिरचीचा पुरवठा होत असला तरी, नवीन पीक कमी असल्याने दर प्रचंड वधारले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे दर थेट ४५० ते ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने गृहिणींचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून, रोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या तिखटाचा वापर करताना आता विचार करावा लागत आहे.

मिरची उत्पादक शेतकरी रोहित गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातसह विविध राज्यांतून मिरची येत असली तरी कर्नाटकातील संकेश्वर, अन्नीगेरी आणि हुनगुंद या भागातील मिरचीची चव वैशिष्ट्यपूर्ण असल्याने तिला मोठी मागणी असते.

मात्र, यंदा अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. ज्या ठिकाणी एकरी दहा पोत्यांचे उत्पादन अपेक्षित होते, तिथे पावसामुळे केवळ पाच पोत्यांवर समाधान मानावे लागले आहे. उत्पादनात झालेली ही ५० टक्के घट आणि लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्यामुळे बाजारपेठेत मिरचीचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम दरांवर दिसून येत आहे.

बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या वर्षी मिरचीचे विक्रमी उत्पादन झाल्याने दर घसरले होते, ज्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. मात्र, यंदा परिस्थिती नेमकी उलट असून आवक कमी झाल्याने तिखट आणि बॅडगी मिरचीचे दर भडकले आहेत. पुढील तीन ते चार महिने हे दर चढेच राहण्याची शक्यता असून, मागणी वाढल्यास दरांचा हा ठसका आणखी वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एकीकडे सण-समारंभांची धामधूम असताना दुसरीकडे मिरचीच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

या दरवाढीचा सर्वात मोठा परिणाम मसाला उद्योगावरही झाला असून, अनेक लहान-मोठे मसाला उत्पादक आता कच्चा माल खरेदी करताना हात राखून व्यवहार करत आहेत. बाजारात मिरचीची टंचाई जाणवू लागल्याने काळा बाजार होण्याची भीतीही वर्तवण्यात येत असून, ग्रामीण भागातील साठवणूक केंद्रांवर व्यापाऱ्यांची विशेष नजर आहे. येत्या काळात पावसाचे प्रमाण आणि नवीन पिकाची गुणवत्ता कशी राहते, यावरच मिरचीचे भवितव्य अवलंबून राहणार असून, तोपर्यंत गृहिणींना तिखटाच्या बाबतीत काटकसर करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.