बेळगाव लाईव्ह : मूळचे चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावचे सुपुत्र आणि सध्या बेळगाव येथील मराठा सेंटरमध्ये कार्यरत तसेच बेळगावात वास्तव्यास असलेले रामचंद्र पवार यांची भारतीय कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार यांची पुरुषांच्या वरिष्ठ भारतीय कुस्ती संघासाठी तसेच जागतिक रँकिंग सिरीज – क्रोएशिया या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती संघ, नवी दिल्ली आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने वरिष्ठ भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षण शिबिर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ट्रेनिंग सेंटर, लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे 25 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर येणाऱ्या वरिष्ठ एशियन गेम्स तसेच वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर 2 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणाऱ्या पहिल्या जागतिक रँकिंग कुस्ती स्पर्धा, झेग्रेब (क्रोएशिया) यासाठीही भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून रामचंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये कनिष्ठ भारतीय महिला कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी अथेन्स (ग्रीस) येथे देशाला जागतिक अजिंक्यपद मिळवून दिले होते. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची वरिष्ठ भारतीय पुरुष कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वरिष्ठ भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त होणारे रामचंद्र पवार हे महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलेच कोच आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.




