belgaum

पुढील २१ वर्षांच्या ‘विकसित भारता’चा संकल्प अर्थसंकल्पातून स्पष्ट : व्ही. सोमण्णा

0
102
 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा पुढील २१ वर्षांच्या ‘विकसित भारता’चा संकल्प असून, याद्वारे देशाच्या प्रगतीची नवी दिशा निश्चित झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी बेळगाव येथे केले.

शनिवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्ही. सोमण्णा बोलत होते. त्यांनी माहिती दिली की, आगामी काळात बेंगळुरू-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने रेल्वे विभागासाठी २ लाख ९३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यातून रेल्वे डब्यांचे नूतनीकरण आणि प्रवाशांच्या सुखसोयींसाठी विविध आधुनिक योजना राबवल्या जाणार आहेत.

बेळगाव-कित्तूर-धारवाड या नवीन रेल्वे मार्गाबाबत बोलताना सोमण्णा म्हणाले की, या प्रकल्पासाठी बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० एकर जमीन राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्यास प्रत्यक्ष कामाला लगेच सुरुवात होईल. मात्र, या संदर्भात मुख्यमंत्री आणि धारवाडचे पालकमंत्री संतोष लाड यांना विनंती करूनही अद्याप कोणताही उपयोग झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

रेल्वे विभागाच्या पदोन्नती परीक्षेत कन्नड भाषेच्या वापरावरून निर्माण झालेल्या गोंधळावर त्यांनी स्पष्ट केले की, ही समस्या इतर राज्यांतही आहे, परंतु मुख्य परीक्षा संबंधित राज्याच्या भाषेत देण्याची मुभा आधीच देण्यात आली आहे.

यावेळी व्ही. सोमण्णा यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कोणतीही मोठी योजना राबवलेली नाही, ते केवळ खोटारडे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका त्यांनी केली. मेट्रोचे दर वाढल्याबद्दल केंद्राला दोष देणाऱ्या राज्य सरकारने स्वतःचे योगदान काय, हे सांगावे.

भविष्यात कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पुन्हा येणार नाही, असे भाकीतही व्ही. सोमण्णा यांनी यावेळी वर्तवले. या पत्रकार परिषदेला भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहराध्यक्ष गीता सुतार, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी खासदार रमेश कत्ती, माजी आमदार संजय पाटील, महंतेश कवटगीमठ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.