belgaum

पिरनवाडीतील चार मुले येळ्ळूर शिवारात सापडली;

0
1489
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी गावातील अंदाजे सात ते आठ वयोगटातील चार शाळकरी मुले येळ्ळूर शिवारात सापडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. येळ्ळूर येथील शेतकरी शेतात कामासाठी गेले असताना ही मुले इकडे-तिकडे फिरताना त्यांच्या निदर्शनास आली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत मुलांना ताब्यात घेऊन तात्काळ पोलिसांना माहिती दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, पिरनवाडी गावातील ही चारही मुले गल्लीत खेळत असताना एका अज्ञात व्यक्तीने “तुम्हाला फिरायला घेऊन जातो” असे सांगून त्यांना दुचाकीवर बसवले आणि येळ्ळूर गावाच्या शेतवडी परिसरात सोडून दिले. मुलांकडे त्यांच्या कपड्यांच्या छोट्या पिशव्या देखील होत्या.


सोडून दिल्यानंतर ही मुले शेतामध्ये फिरत असताना शेणखत टाकण्यासाठी गेलेले कार्लेकर बंधूंना ती दिसून आली. मुलांनी आपली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ येळ्ळूर येथील माजी ग्राम पंचायत सदस्य सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

 belgaum

दरम्यान, पिरनवाडीतील मुलांचे आई-वडील सकाळपासून मुलांचा शोध घेत होते. सायंकाळी त्यांनी पोलीस ठाणे गाठून बेपत्ता मुलांची तक्रार दिली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून येळ्ळूर गावच्या श्री विठ्ठल रुखमाई मंदिर परिसरात मुलांना ताब्यात घेतले.

रात्री सात ते आठच्या दरम्यान मंदिरासमोर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी मुलांची ओळख पटवून त्यांच्या पालकांना बोलावून घेतले आणि चौकशीअंती मुलांना सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले.


या घटनेमुळे बेळगाव ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली असून, लहान मुलांना दुचाकीवरून नेणारी अज्ञात व्यक्ती नेमकी कोण होती, याचा तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.