बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीस जिल्हा विशेष पोक्सो न्यायालय-1, बेळगाव यांनी 30 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137 अंतर्गत 7 वर्षांची अतिरिक्त शिक्षा व 25 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.
ही घटना संकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 109/2024 अंतर्गत पोक्सो कायद्याच्या कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा विशेष केस क्रमांक 661/2024 असा आहे.
फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस आरोपी दर्शन भगवंत हुणश्याळी (वय 23, रा. शंकर नगर, संकेश्वर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याने लग्नाचे आमिष दाखवून फसवले. दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी कॉलेजमधून परत येताना आरोपीने तिला पळून जाण्याची भाषा केली होती. त्यानंतर 27 ऑगस्ट 2024 रोजी रात्री तिला दुचाकीवरून चिक्कोडीमार्गे अथणी येथे नेऊन भाड्याच्या घरात ठेवून तिच्यावर जबरदस्ती केली होती.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक के.बी. कंठी यांनी गुन्हा नोंदवला असून तपास अधिकारी आर.एस. खोते व एस.एम. आप्पूजी (पोलीस निरीक्षक, संकेश्वर) यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय-1, बेळगाव यांच्या न्यायाधीश श्रीमती सी.एम. पुष्पलता यांनी एकूण 8 साक्षीदार, 50 दस्तऐवज व 6 मुद्देमाल यांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने वरील शिक्षा सुनावली.
तसेच पीडित मुलीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले असून ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत 5 वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. एल. व्ही. पाटील (बेळगाव) यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला.




