बेळगाव लाईव्ह : मोठ्या शिक्षण घोटाळ्यात यमुनापूर येथील एका डॉक्टरने एमबीबीएस प्रवेश तसेच रशियामधील नोकऱ्यांचे आमिष दाखवून ३७ जणांची सुमारे ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव सुरज अशोक अनगोळकर असे असून तो यमुनापूर येथील हरिप्रिया कुंज, मारुती गल्ली येथे राहणारा आहे. तो पत्नीसमवेत खडेबाजार येथील राजेंद्र कॉम्प्लेक्समध्ये ‘स्नेहा क्लिनिक’ चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीच्या आधारे खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
न्यू गांधीनगर येथील रहिवासी अझरुद्दीन अब्दुल समद रंगारी (३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण रशियामधून एमबीबीएस पूर्ण केले असून तेथील वैद्यकीय महाविद्यालयांशी आपले घनिष्ठ संबंध असल्याचा दावा त्याने केला. तसेच एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याबरोबरच रशियात चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

मासिक ९० हजार रुबल (सुमारे १.०४ लाख रुपये) पगार व जेवणाची सोय असल्याचे सांगत त्याने अनेकांना विश्वासात घेतले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार, त्याचे मित्र आणि इतरांनी मिळून एकूण ७४ लाख रुपये दिले. यामध्ये १३.५ लाख रुपये फोनपे द्वारे तर ६०.५ लाख रुपये रोख स्वरूपात क्लिनिकमध्ये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपीने कथितपणे २२ उमेदवारांना कामाच्या व्हिसाऐवजी भेटीच्या (व्हिजिट) व्हिसावर रशियाला पाठवले, मात्र १५ दिवसांतच त्यांना भारतात परत पाठवण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महंतेश धामणवर करत आहेत.




