बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बेळगाव येथील जिल्हा विशेष पॉक्सो न्यायालय क्रमांक-1 ने आरोपीला 30 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीवर 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्याद मार्केट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार मार्केट पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 104/2024 अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण विशेष केस क्रमांक 638/2024 अंतर्गत न्यायालयात चालवण्यात आले.
फिर्यादीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असूनही आरोपी
कृष्णा मल्लेशी गाडीवडर (वय 23 वर्षे, रा. प्लॉट नं. 144, रामनगर वडरवाडी, बेळगाव)
याने दिनांक 29 जुलै 2024 रोजी मुलीचे अपहरण करून तिला गोवा राज्यात एका घरात बेकायदेशीरपणे ठेवले.
दिनांक 29 जुलै 2024 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत आरोपीने पीडितेवर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीव ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाची नोंद पीएसआय हुसेनसाब एल. केरूर यांनी केली होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक महांतश के. धामण्णवर (मार्केट पोलीस ठाणे) यांनी केला.
तपास पूर्ण करून दोषारोपपत्र बेळगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष जलदगती पॉक्सो न्यायालय-01 येथे सादर करण्यात आले.
माननीय न्यायाधीश सौ. सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणाची सुनावणी करत,
• एकूण 8 साक्षीदार
• 60 कागदपत्रे
• 2 मुद्देमाल
या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला:
• 30 वर्षांची सक्तमजुरी
• 1 लाख रुपयांचा दंड
• दंड न भरल्यास अतिरिक्त 2 वर्षांची कारावासाची शिक्षा
असा निकाल सुनावला.
तसेच पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून 4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत 5 वर्षांसाठी मुदत ठेवीत ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. एल. व्ही. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
हा निकाल अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक संदेश देणारा ठरला आहे.



