बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे काल 4 फेब्रुवारी 2026 रोजी ‘मराठा दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली शरकत युद्ध स्मारकाला सन्माननीय पुष्पहार अर्पण करून मराठा दिन समारंभाची सुरुवात झाली. या समारंभात शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच रेजिमेंटच्या शौर्य, बलिदान आणि राष्ट्राप्रती कर्तव्याच्या चिरस्थायी वारशाची पुष्टी करण्यात आली.
मुख्य कार्यक्रमात मराठा लाईट उइन्फंट्री रेजिमेंटल सेंटर पीटी ग्राउंडवर आयोजित केलेल्या बाराखान्याचा समावेश होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि कुटुंब कल्याण संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मृणालिनी मुखर्जी यांनी भुषविले.
याप्रसंगी मराठा सेंटरचे स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक मान्यवर, माजी सैनिक, कुटुंबे आणि नागरी कर्मचारी उपस्थित होते. हे दृश्य माजी सैनिक आणि नागरी समुदाय यांच्यातील मजबूत बंध प्रतिबिंबित करणारे होते.

मराठा दिनाच्या या सुव्यवस्थित सोहळ्यामध्ये रेजिमेंटच्या शिस्त आणि योद्धा नीतिमत्तेवर प्रकाश टाकणारा उच्च दर्जाचे मार्शल आर्ट्स प्रदर्शन, त्यानंतर भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक -संगीत कार्यक्रमांचा समावेश होता. कलाकारांचा सत्कार करण्यात आला आणि बाराखानाने पिढ्यान्पिढ्या परस्परसंवाद, सौहार्द आणि रेजिमेंटल बंध मजबूत करण्यासाठी एक आदर्श वातावरण प्रदान केले. मराठा दिनानिमित्त अग्निवीरांसाठी तुर्कमट्टी येथे पेहला कदम सराव आयोजित करण्यात आला.
सदर 2 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या सरावात 547 अग्निवीरांचा सहभाग होता. तसेच आजपासून 7 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या सरावामध्ये 543 अग्निवीर भाग घेत आहेत. पहिल्या सत्रातील सरावाचा समारोप तुर्कमट्टी संरक्षण भूमीपासून रेजिमेंटल सेंटरपर्यंत शिस्तबद्ध रूट मार्चने झाला. ज्याने सहनशक्ती, वचनबद्धता आणि परंपरागत प्रशिक्षण यांच्यातील अखंड एकात्मतेचे दर्शन घडवले.




