belgaum

श्री कपिलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीची जय्यत तयारी;

0
331
 belgaum

बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये उद्या रविवारी श्री महाशिवरात्र भव्य प्रमाणात भक्तीभावाने साजरी केली जाणार असून गेल्या दोन दिवसांपासून जय्यत तयारी सुरू आहे. विविध अभिषेक व अन्य धार्मिक विधींबरोबरच उत्तुंग स्प्रिंकलर कारंजा आणि कर्नाटकातील सर्वात मोठी 12 ज्योतिर्लिंगांची वास्तववादी रांगोळी हे उद्याच्या श्री महाशिवरात्रीचे विशेष आकर्षण असणार आहे अशी माहिती श्री कपिलेश्वर मंदिर विश्वस्त समितीचे अभिजीत चव्हाण यांनी आज दिली.

श्री कपिलेश्वर मंदिराच्या ठिकाणी बेळगाव लाईव्हशी बोलताना अभिजीत चव्हाण यांनी सर्वप्रथम शहरवासीयांना श्री महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर येथे गेल्या दोन दिवसापासून श्री महाशिवरात्रीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. श्री महाशिवरात्री निमित्त श्री कपिलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळातर्फे कोणता ना कोणता स्तुत्य उपक्रम राबवला जात असतो आणि दरवर्षी त्याबाबतची उत्सुकता भक्त मंडळींना लागून राहिलेली असते.

त्यानुसार यावेळी श्री गणपती विसर्जन तलावामध्ये उत्तुंग असा इलेक्ट्रिक स्प्रिंकलर कारंजा बसवण्यात आला आहे. तसेच तलावाच्या ठिकाणी सात्विक कला ग्रुपने कर्नाटक राज्यातील पहिली सर्वात मोठी वास्तववादी (रियालिस्टिक) रांगोळी रेखाटण्याचा संकल्प केला होता. त्याला श्री कपिलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने आपला संपूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळे सात्विक कला ग्रुप आणि श्री कपिलेश्वर मंदिर यांच्या विद्यमाने 12 ज्योतिर्लिंग दर्शवणारी ती भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे. तसेच सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी मंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरवासीयांनी बहुसंख्येने या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले

एक विशेष सूचना करताना ते म्हणाले की, देवाच्या पंचामृत अभिषेकासाठी ज्या भक्तांनी रात्री 3 वाजेपर्यंत नांव नोंदणी केली आहे, त्यांचेच अभिषेक उद्या पहाटे होतील. या विधीनंतर सकाळी 6 वाजल्यापासून विशेष रुद्राभिषेक आणि दुपारी 12:30 वाजल्यानंतर लघुरुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री महाशिवरात्री निमित्त भव्य पालखी प्रदक्षिणा आणि महाआरती होणार आहे. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. याखेरीस मंदिराची विश्वस्त समिती व सेवेकरी ज्या सूचना करतील त्यांचे कृपया सर्वांनी काटेकोर पालन करावे, असेही अभिजीत चव्हाण यांनी स्पष्ट केले.

श्री कपलेश्वर गणपती विसर्जन तलावाच्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांची भव्य रांगोळी साकारणाऱ्या सात्विक कला ग्रुपचा प्रमुख सात्विक अनिगोळ आणि निलेश पाटील यांनी रांगोळी बद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, या पद्धतीची आमच्या ग्रुपची ही आठवी भव्य रांगोळी आहे. ही रांगोळी कर्नाटकातील सर्वात मोठी वास्तववादी रांगोळी असून तिचा आकार 32×26 फूट इतका भव्य आहे. परवा दिवशी आम्ही ही रांगोळी रेखाटण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काल रंगकाम सुरुवात करण्यात आले असून संपूर्ण रात्र जागून आम्हीही रांगोळी तयार केली आहे.

या रांगोळीसाठी आम्ही एकूण 19 रंगछटांचा वापर केला असून ती पूर्ण करण्यासाठी 25 पोती रांगोळी लागली आहे. कला शिक्षिका प्रिया सूनगार, सात्विक अनिगोळ, रेवती पाटील आणि निलेश पाटील असे आमच्या चौघांच्या गटाने ही रांगोळी रेखाटली आहे अशी माहिती देऊन मालवण येथील स्फटिक लिंगाप्रमाणे आम्ही आमच्या रांगोळीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांचे स्फटिक स्वरूपात दर्शन घडविले असून जे रात्रीच्या वेळी अतिशय विलोभनीय दिसेल, असे सात्विक अनिगोळ याने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.