belgaum

कित्तूर जवळ कार अडवून दरोडा…इंजिनिअरला लुटले

0
920
 belgaum


बेळगाव लाईव्ह :मुंबई येथील इंजिनिअर वैभव व्यवहारे आपल्या सहकाऱ्यासह सुरतकल येथील एनआयटी कॉलेजला जात असताना, कित्तूर-अळणावर रस्त्यावरील कुलवळ्ळी गावाजवळ आठ जणांच्या टोळीने त्यांची कार अडवून दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटल्याची घटना घडली आहे.. दरोडेखोरांनी कारवर दगडफेक करून दहशत माजवत ही चोरी केली असून, याप्रकरणी कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई येथील फ्युचर कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे टेक्निकल हेड वैभव मोहन व्यवहारे आणि त्यांचे सहकारी देवेंद्र कदम हे मंगळुरू येथील सुरतकल एनआयटी कॉलेजला जात असताना कित्तूर-अळणावर रस्त्यावर ही धक्कादायक घटना घडली. आठ जणांच्या टोळीने त्यांची कार अडवून भररस्त्यात लूटमार केली.

वैभव व्यवहारे आणि देवेंद्र कदम हे आपल्या कारने (MH-02 GP-9465) मुंबईहून एनएच-४८ मार्गे मंगळुरूकडे निघाले होते. २१ फेब्रुवारी रोजी पहाटे १२:३७ च्या सुमारास कित्तूर येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरून ते अळणावरच्या दिशेने निघाले असता हा प्रकार घडला.

पहाटे १:१० च्या सुमारास कुलवळ्ळी गाव ओलांडल्यानंतर एका दुचाकीस्वाराने कारला ओव्हरटेक करून थांबण्याचा इशारा केला. कारचा वेग कमी होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या अन्य तीन दुचाकींवरील आठ जणांनी कारला वेढा घातला. एकाने कारच्या बोनेटवर मोठा दगड मारून नुकसान केले, तर इतरांनी कन्नड भाषेत आरडाओरडा करत कारचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले.

घाबरलेल्या वैभव यांनी दरवाजा उघडताच एका दरोडेखोराने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची आणि सुमारे २ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. दरोडेखोर घाईत असल्यामुळे वैभव यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या वाचल्या. टोळीने देवेंद्र कदम यांचीही झडती घेतली, मात्र त्यांच्याकडे काहीही न मिळाल्याने त्यांनी कारची डिकी तपासून सर्वांना तेथून निघून जाण्यास सांगितले.

घटनेनंतर वैभव व्यवहारे यांनी आपल्या मित्राला फोन करून माहिती दिली आणि अळणावर येथील पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कित्तूर पोलिसांना पाचारण केले. याप्रकरणी वैभव व्यवहारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कित्तूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरोडेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी वैभव व्यवहारे यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.