बेळगाव लाईव्ह:खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी राजा शिवछत्रपती स्मारक, खानापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेच्या सुरुवातीला समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
प्रस्ताविक करताना सरचिटणीस आबासाहेब दळवी म्हणाले की, “अजितदादा पवार यांच्या निधनावर विश्वास बसणे कठीण आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रासह सीमाभागावर शोककळा पसरली आहे.”
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सांगितले की, “पवार कुटुंबावर जसा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तसाच तो आम्हा सीमावासीयांवरही कोसळला आहे. खानापूरची जनता या दुःखात सहभागी आहे.”

अध्यक्ष गोपाळराव देसाई म्हणाले, “सीमाप्रश्नाची सोडवणूक अजितदादांच्या हयातीत झाली असती तर फार चांगले झाले असते. आज सीमाप्रश्नी समितीच्या नेत्यांच्या ते सातत्याने संपर्कात होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, “आज सीमाप्रश्न गांभीर्याने घेणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. त्यात अजितदादा हे अग्रस्थानी होते. त्यांच्या जाण्याने युवा पिढीलाही मोठा धक्का बसला आहे.”
गोपाळ पाटील यांनी अजितदादांच्या धडाडीच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सीमाप्रश्न सुटावा, हीच त्यांची खरी इच्छा होती, असे मत व्यक्त केले.विलास बेळगावकर यांनी अजितदादांसोबतच्या आठवणी सांगत श्रद्धांजली वाहिली.
कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रकाशराव चव्हाण, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, रुक्मिणा झुंजवाडकर आदींनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी रणजीत पाटील, डी. एम. भोसले, पुंडलिक पाटील, मरू पाटील, कृष्णा मनोळकर, जयसिंगराव पाटील, विशाल बुवाजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




