बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र, भारतीय सैन्य दलातील जवान जगदीश मनोहर शिंदे यांच्यावर आज दुपारी गावच्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरियाणातील अंबाला येथे कर्तव्यावर असताना गेल्या सोमवारी, दि. 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या वाहन दुर्घटनेत जगदीश शिंदे शहीद झाले. दिवंगत जगदीश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे. या कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय जवानाच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांचे पार्थिव आज बुधवारी सकाळी विमानाने बेळगाव विमानतळावर आणण्यात आले व तेथून कंग्राळी खुर्द गावात नेण्यात आले. गावात सकाळी काही काळ पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक, ग्रामस्थ, अबालवृद्धांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली व शिंदे कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

जगदीश शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील युवक दुचाकींवरून हातात तिरंगे ध्वज घेऊन कंग्राळी खुर्द गावाकडे जाताना दिसत होते. अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी ग्रामपंचायत व युवक मंडळातर्फे त्यांच्या घराकडे तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रस्त्याकडेला व गावातील चौकाचौकांत शहीद जवान जगदीश शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे फलक उभारण्यात आले होते.
अंतिम दर्शनानंतर पार्थिवाची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील नागरिक, युवा कार्यकर्ते तसेच शाळकरी मुले हातात तिरंगे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीत आज दुपारी शोकाकुल वातावरणात शहीद जवान जगदीश मनोहर शिंदे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.





