बेळगाव लाईव्ह : बनावट आधारकार्ड आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकाची फसवणूक करून जमिनीचे हस्तांतरण करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसोबतच हुक्केरी आणि संकेश्वर येथील उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी एका उपनिबंधकाला अटक केली आहे.
हुक्केरी आणि यमकनमर्डी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, उपनिबंधक मडिवालय्या बनिमठ याला पोलिसांनी अटक केली आहे. मे आणि जून २०२५ दरम्यान सुमारे सहा एकर जमिनीचा व्यवहार बनावट व्यक्ती उभ्या करून पूर्ण करण्यात आला होता.
या प्रकरणातील मुख्य तक्रारदार शिवानंद मारुती कुदनुरी यांनी २२ जानेवारी रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवून नीलकंठ मुडपकी आणि अशोक सूर्यवंशी यांच्यासह विजय मठद यांना अटक केली. पोलिसांनी सूर्यवंशी फोटो स्टुडिओवर छापा टाकून बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप, प्रिंटर आणि कॅमेरा जप्त केला आहे.
या घोटाळ्याची माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी सांगितले की, आरोपींनी जाणीवपूर्वक आधार प्रमाणीकरण टाळून आणि कागदपत्रांची पडताळणी न करता जमिनीची नोंदणी केली.
आरोपींनी प्रथम जमीन दुसऱ्याच्या नावे हस्तांतरित केली आणि त्यानंतर तिची त्वरित विक्री केली. या टोळीने मूळ मालकांच्या जागी तोतया व्यक्ती उभ्या करून सरकारी यंत्रणेची दिशाभूल केल्याचे के. रामराजन यांनी स्पष्ट केले.
उद्यमबाग पोलिसांनी वाघवाडे येथील जमिनीचा असाच घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता हा दुसरा मोठा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात कुरणी गावातील काही संशयितांचाही समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच या संपूर्ण व्यवहारात सामील असलेल्या संकेश्वर येथील दुसऱ्या उपनिबंधकाचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर चार दिवसांपूर्वी हुक्केरी पोलिसांनी उपनोंदणी अधिकाऱ्यासह दोघा जणांना अटक केली होती. संकेश्वर पोलिसांनीही महिलेसह चौघा जणांना अटक केली आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले कॉम्प्युटर,
लॅपटॉप, कॅमेरा, दोन प्रिंटर,लॅमिनेशन मशीन जप्त करण्यात आली आहे. संकेश्वर, यमकनमर्डी व हुक्केरी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात फसवणुकीचे असे अनेक प्रकार घडले आहेत.
22 जानेवारी 2026 रोजी दुपारी शिवानंद मारुती कुदनुरी, राहणार कुरणी, ता. हुक्केरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणुका शंकर माळी, शिवरुद्र प्रधानी कुदनुरी,काशव्वा शिवरुद्र कुदनुरी, निलकंठ शेट्ट्याप्पा मुदपाकी, याआधीच मृत्युमुखी पडलेल्या अडव्याप्पा शेट्ट्याप्पा मुदपाकी, सिद्दय्या निरुपादय्या हिरेमठ सर्व राहणार कुरणी, आनंद एम. दड्डीमनी व हुक्केरी येथील उपनोंदणी अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.




