belgaum

सरकार नाही, युवा कार्यकर्त्याची मदत! शेतरस्त्यांचा स्वखर्चाने विकास

0
552
gojga
 belgaum

बेळगाव लाईव्ह : जनसेवेसाठी कायम तत्पर असणारे बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते व आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील यांनी पुन्हा एकदा समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. गोजगे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अनेक वर्षांपासून झालेली दुर्दशा पाहून त्यांनी सरकारकडे वाट न पाहता स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च करून रस्त्यांचा विकास सुरू केला आहे.

गोजगे (ता. जि. बेळगाव) येथील शेतरस्ते दीर्घकाळ विकासापासून वंचित होते. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था इतकी बिकट होत होती की शेतकऱ्यांना शेतात जाणे, माल वाहतूक करणे मोठ्या अडचणीचे बनले होते. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित खात्याकडे अर्ज, निवेदने दिली, मात्र कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. अखेर ही बाब चेतन पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला.

फक्त आश्वासन न देता त्यांनी सोमवारी स्वखर्चाने रस्त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात येत असून तांबडी माती टाकून मार्ग सुकर केला जात आहे. सध्या या कामासाठी सुमारे २५ ट्रॅक्टर, डंपर व इतर वाहने सातत्याने कार्यरत असून दररोज सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत खर्च होत असल्याची माहिती आहे.

gojga

या उपक्रमामुळे गोजगे गावातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त होत आहे.
एका शेतकऱ्याने प्रतिक्रिया देताना सांगितले, “आम्ही अनेकांकडे मागणी केली, पण कोणीच लक्ष दिले नाही. मात्र चेतन पाटील स्वतः आमच्या मदतीला धावून आले. स्वखर्चाने रस्ते दुरुस्त करत असल्याबद्दल आम्ही रयत संघटनेच्यावतीने त्यांचे मनापासून आभार मानतो.”

 belgaum

सरकारवर अवलंबून न राहता थेट लोकांसाठी काम करण्याची ही भूमिका समाजसेवेसाठी इच्छुक युवकांसाठी नवा आदर्श ठरत आहे. गोजगेतील शेतरस्त्यांचा हा विकास केवळ रस्त्यांचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचा मार्ग मोकळा करणारा ठरतो आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.