बेळगाव लाईव्ह :शिवाजी ट्रेल संघटनेच्या पॅन इंडिया गड-पुजन उपक्रमांतर्गत येळ्ळूरजवळील राजहंसगड, बेळगावचा भुईकोट किल्ला तसेच चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड येथे रविवारी विधिवत गड-पुजन कार्यक्रम संपन्न झाला.
पुणेस्थित शिवाजी ट्रेल संघटनेमार्फत दरवर्षी देशभरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सैन्याच्या पाऊलखुणा असलेल्या गड-किल्ल्यांवर, स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते एकाच दिवशी पूजन केले जाते. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून यंदाही बेळगाव परिसरातील गडांवर पूजन करण्यात आले.
राजहंसगड (येळ्ळूर)
येळ्ळूरजवळील राजहंसगडाची सपत्नीक पूजा शिवाजी ट्रेलचे संयोजक व सद्भावना दूत श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे (हारोलीकर सरकार) आणि श्रीमंत दिलीपराव केशवराव रायजादे (हारोलीकर सरकार) यांच्या हस्ते पार पडली.
या उपक्रमामागील उद्देश भावी पिढीला गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटवून देणे तसेच त्यांच्या संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा आहे. कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पूजेचे पौरोहित्य बसवराज मठपती यांनी केले. कार्यक्रमास सुचिता रमेशराव रायजादे, सचिन सांबरेकर तसेच सोहम घाडी, सोहम पाटील, प्रणित पाटील, प्रणव हट्टीकर, समर्थ अष्टेकर, यश मुचंडी, गौतम देवलतकर, रोहन कुगजी, सोहम कुगजी, गौतम अष्टेकर, पार्थ अष्टेकर, कुणाल कुगजी, अन्विश मुचंडी आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
भुईकोट किल्ला, बेळगाव
बेळगाव येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरही गड-पुजन पार पडले. निप्पाणी येथील संस्थानिक घराण्याचे थेट वंशज श्रीमंत दादा राजे नाईक निंबाळकर (सरलष्कर राजेसाहेब, निप्पाणी) यांच्या हस्ते पूजन होणे अपेक्षित होते; मात्र वैयक्तिक कारणास्तव यंदा त्यांचे मेहुणे श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे व सौ. सुचिता रमेशराव रायजादे यांच्या हस्ते कार्यक्रम झाला.

किल्ल्यातील टीए बटालियनचे पंडितजी नाईक संदीप पुजारी यांनी पौरोहित्य केले. मुख्य द्वार चौकट पूजन, ध्वजपूजन तसेच दुर्गादेवी पूजन करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास सचिन सांबरेकर, सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
किल्ले पारगड, ता. चंदगड
चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पारगड येथेही गड-पुजन करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायरी पूजन, ध्वज पूजन तसेच मारुती मंदिर व भगवती देवी मंदिरात पूजा करण्यात आली.
कार्यक्रमास प्रकाश चिरमोरे, विठ्ठल शिंदे, प्रवीण चिरमोरे, प्रकाश झेंडे, अर्जुन तांबे, प्रकाश पवार, मनोहर पवार, आत्माराम पवार, तुकाराम बने व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
गड-किल्ले हे आपल्या इतिहासातील पराक्रमाचे कीर्तीस्तंभ असून त्यांचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




