बेळगाव लाईव्ह : मागील वर्षी बेळगाव पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट कॉल सेंटर आणि अमेरिकन नागरिकांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील स्थगिती आदेश उठवल्यामुळे तपासातील अडथळे दूर झाले असून, मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फसवणुकीचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने हा तपास सीआयडीकडे सोपवला होता. मात्र, सीआयडीने अधिकृतपणे तपास हाती घेण्यापूर्वीच आरोपींनी तांत्रिक त्रुटींचा आधार घेत उच्च न्यायालयातून जामीन आणि तपासाला स्थगिती मिळवली होती. तब्बल तीन महिन्यांनंतर सोमवारी उच्च न्यायालयाने ही स्थगिती हटवली असून, लवकरच सीआयडी या प्रकरणाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यात बेळगाव पोलिसांनी केलेल्या छाप्यात पाच महिलांसह ३३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून ३७ लॅपटॉप, ३७ मोबाईल आणि अनेक तांत्रिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. प्राथमिक तपासानुसार, या टोळीने १,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. या टोळीचे मुख्य सूत्रधार पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये असून, बेळगावचा वापर केवळ केंद्र म्हणून केला जात होता.
आरोपी व्हीओआयपी आणि व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांना धमकावत असत. ‘डिजिटल अटक’ किंवा कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पीडितांकडून गिफ्ट कार्डच्या माध्यमातून पैसे उकळले जात होते. जप्त केलेल्या उपकरणांच्या प्राथमिक तपासणीत ८५ अमेरिकन नागरिकांच्या फसवणुकीचे पुरावे मिळाले असून, संपूर्ण तपासणीनंतर हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.




