belgaum

डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवा

0
420
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथील शाहुनगर भागात असलेल्या डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीवर स्थानिक प्रभावी व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करत आज दलित संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेकडो वर्षांपासून हक्काची असलेली ही जागा भूमाफियांपासून मुक्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खानापूर येथील सर्व्हे नंबर ९३/ए १ मध्ये गेल्या ३०० वर्षांपासून डोंबारी समाज आपल्या पूर्वजांवर अंत्यसंस्कार करत आला आहे. मात्र, गेल्या काही काळापासून बंद पडलेल्या एका खासगी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून, स्थानिक धनदांडग्यांनी या स्मशानभूमीतील झाडे तोडून थेट मृतांच्या थडग्यांवरच घरे बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 belgaum

बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या स्मशानभूमीची जागा महसूल दप्तरी अधिकृतपणे डोंबारी समाजाच्या नावे करावी. तसेच सभोवतालची अनधिकृत बांधकामे तातडीने जमीनदोस्त करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिवंतपणी उपेक्षित जीवन जगणाऱ्या या समाजाला मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न उरणे, हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून आम्हाला न्याय न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा संघटक राजशेखर हिंडलगी यांनी व्यक्त केली.

डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण हे प्रशासकीय गलथानपणाचे लक्षण असून, गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कडक पावले उचलावीत, असे मल्लेश चौगुले यांनी म्हटले.

या संदर्भात खानापूर तहसीलदार आणि नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. उलट अतिक्रमण करणारे लोक न्यायालयाची दिशाभूल करून आणि पोलीस संरक्षणाखाली या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आंदोलकांनी निवेदनात केला आहे. या आंदोलनात डोंबारी समाज बांधवांसह दलित संघर्ष समितीचे नेते आणि विविध मान्यवर सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.