बेळगाव लाईव्ह : बाळेकुंद्री खुर्द येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवराज अनंतराव जाधव यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त बाळेकुंद्री लक्ष्मीनगर येथील मैदानावर जय्यत तयारी करण्यात येत आहे.
सकाळी पुण्याचे वारकरीरत्न पुंडलिक महाराज देहूकर यांचा कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर यांचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे.
उद्योजक शिवराज जाधव हे लँड डेव्हलपर म्हणून परिचित आहेत. व्यवसायाबरोबरच त्यांनी समाजसेवेचा ध्यास घेत या भागात अनेक उपक्रम राबविले आहेत. धार्मिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्राचे आश्रयदाते म्हणून त्यांनी नवी ओळख निर्माण केली आहे. पंचक्रोशीत होणाऱ्या कुस्ती, क्रिकेट, बैलगाडी शर्यत, कबड्डी आदी स्पर्धांना त्यांनी आर्थिक सहाय्य केले आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी गावात अनेक विकासकामे राबविली आहेत.

वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी ११ वाजता जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज पुंडलिक महाराज देहूकर यांचा भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज हभप एकनाथ तुळसीदास नामदास (पंढरपूर) आणि संत कबीर महाराजांचे वंशज हभप रघुनाथ सदाशिव महाराज कबीर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सायंकाळी ७ वाजता राधा पाटील मुंबईकर यांच्या लावणीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष प्रशांत जाधव आणि भाजपा नेते युवराज जाधव यांनी केले आहे.





