बेळगाव लाईव्ह : मुरुगेंद्रगौडा करंडक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज खास आकर्षण लाभले. देशातील सर्वात महागडा आणि लोकप्रिय समजला जाणारा स्टार टेनिसबॉल क्रिकेटपटू करण अंबाला आज बेळगावात दाखल झाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तो पांडुरंग सीसी संघाकडून मैदानात उतरणार असून त्याच्या आगमनाने स्पर्धेला नवा उत्साह लाभला आहे.
बेळगावात प्रथमच खेळण्यासाठी आलेल्या करण अंबाला याचे पांडुरंग सीसी संघाचे मालक शिवराज जाधव आणि विनायक कुंभार यांनी पुष्पहार व मानाची शाल घालून उत्साहात स्वागत केले. संघ व्यवस्थापनाने त्याच्या निवास, भोजन व अन्य सोयींची उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल करणने विशेष आभार मानले.
देशाच्या टेनिसबॉल क्रिकेट विश्वात आक्रमक फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे ओळख निर्माण केलेला करण अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. भारताबरोबरच परदेशातील स्पर्धांमध्येही त्याचा दबदबा आहे.
🎙️ ‘क्रिकेटनेच मला निवडलं’
प्रतिक्रिया देताना करण म्हणाला, “शालेय स्तरावर बेसबॉल आणि बॅडमिंटन खेळलो, पण ओळख मिळाली नाही. क्रिकेटनेच मला निवडलं आणि मला माझी ओळख दिली. आयएसपीएलमध्ये निवड होणं हे माझं स्वप्न होतं; ते पूर्ण झाल्याने कुटुंबालाही खूप आनंद झाला.”
अपयशानंतर स्वतःवरील विश्वासामुळे दमदार पुनरागमन करता आलं, असं सांगत त्याने तरुण खेळाडूंना आत्मविश्वास आणि मेहनतीचा संदेश दिला. मैदानात स्पर्धा असली तरी मैदानाबाहेर सर्व खेळाडूंशी मैत्री असते, असेही तो म्हणाला.
त्याने आयएसपीएलमध्ये Manish Pandey आणि Quinton de Kock यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याचा अनुभव आनंददायी असल्याचे सांगितले.

“मी स्वतःच माझी प्रेरणा आहे,” असे ठामपणे सांगत करण अंबालाने उपांत्य फेरीत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्पर्धेच्या आजच्या सामन्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून बेळगावातील क्रिकेटप्रेमींना थरारक लढत पाहायला मिळणार आहे.




