बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे असलेल्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी काही पदार्थ फेकल्याची चर्चा रंगली होती. मात्र या प्रकरणात कोणताही अवमान झाला नसल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.
बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुतळ्यावर व परिसरातील रस्त्यावर आढळलेल्या चिकट पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रादेशिक फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे (RFSL) पाठविण्यात आले होते. प्राप्त अहवालानुसार त्या नमुन्यांमध्ये वनस्पतीजन्य राळ (plant resin) आढळून आली आहे.
तसेच पुतळ्याजवळील झाडांच्या पानांवरूनही नमुने घेण्यात आले होते. त्या पानांवरील पदार्थ आणि पुतळ्यावर सापडलेला पदार्थ यामध्ये साम्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावरून तो पदार्थ झाडातून नैसर्गिकरित्या पडलेली राळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही बारकाईने तपासणी करण्यात आली. कोणतीही व्यक्ती पुतळ्यावर काही फेकताना आढळून आलेली नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व बाबींमुळे कोणत्याही असामाजिक घटकाने पुतळ्याचा अवमान केल्याचा प्रकार घडलेला नसून तो नैसर्गिक कारणामुळे झालेला प्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे निर्माण झालेला गैरसमज दूर झाला असून प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस विभागाने संवेदनशील विषयांवर संयम बाळगण्याचे व खात्रीशीर माहितीवरच प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.




