belgaum

17.81 कोटींच्या नुकसान भरपाईसाठी महापालिकेचे नगर विकास खात्याला साकडे

0
271
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी हेस्कॉमने केलेल्या खोदाईमुळे महापालिकेला झालेली 17 कोटी 81 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हस्तक्षेप करावा, अशी मागणी बेळगाव महानगरपालिकेने कर्नाटक नगर प्रशासन खात्याकडे केली आहे.

बेळगाव महानगरपालिकेला 8 वर्षांनंतरही भूमिगत वीज केबल कामांदरम्यान झालेल्या नुकसानीसाठी हेस्कॉमकडून 17 कोटी 81 लाख रुपये भरपाई मिळालेली नाही. महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात मिळण्यायोग्य म्हणून दाखवलेली ही रक्कम अद्याप अदा झालेली नाही. महानगरपालिकेच्या अधिकृत परवानगीशिवाय 2016 मध्ये काम सुरू झाले आणि खोदकाम शुल्क भरण्यात आले नाही.

ज्यामुळे रस्ते, गटारे आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. महानगरपालिकेत आक्षेप घेतल्यानंतर पालिका विभागाने केलेल्या नुकसान सर्वेक्षणात 17.81 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मूल्यांकन करण्यात आले. या आधारे, महानगरपालिकेने मार्च 2018 मध्ये हेस्कॉमकडून भरपाईची मागणी केली आहे.

बेळगाव महापालिकेने आजवर या भरपाईसाठी हेस्कॉम तसेच राज्याच्या ऊर्जा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तब्बल वीसहून अधिक वेळापत्र व्यवहार, स्मरणपत्रे आणि चलने पाठवून देखील हेस्कॉम किंवा ऊर्जा विभागाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता थेट कर्नाटक नगर प्रशासन खात्याने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा अशी अपेक्षा बेळगाव महापालिकेने व्यक्त केली आहे.

मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या खात्याकडून देखील कोणतीही हालचाल झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या आर्थिक हिताचा आणि शहरातील पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा प्रश्न असलेल्या या प्रकरणात 17.81 कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्रत्यक्षात कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.