बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील काही नगरसेवकांच्या पात्रतेबाबत गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण झाला असून धारवाड खंडपीठाच्या निर्णयानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मालमत्ता आणि दायित्वांची माहिती लपवल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा चेंडू आता महानगरपालिका सभेच्या दरबारी असून आगामी निवडणुकांवरही याचे सावट पाहायला मिळत आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या काही निवडून आलेल्या नगरसेवकांनी सादर केलेल्या मालमत्ता आणि दायित्वांच्या माहितीवरून नवा वाद उफाळला आहे. या संदर्भात राजकुमार टोपण्णावर यांनी महापौरांकडे तक्रार केली असून, कर्नाटक महानगरपालिका कायदा १९७६ च्या कलम १९ नुसार नगरसेवकांनी दिलेली माहिती अपूर्ण आणि नियमबाह्य असल्याचा दावा केला आहे. या विषयावर महानगरपालिकेच्या सभेत तातडीने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे काही नगरसेवकांनी आपली संपूर्ण मालमत्ता जाहीर केली नसल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. कलम १९ अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आयुक्तांना नसून, अपात्रतेचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, यासाठी महानगरपालिकेच्या सभेचा अधिकृत संदर्भ असणे अनिवार्य असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
नगरसेवकांनी मालमत्ता किंवा दायित्वांची अचूक माहिती न देणे हे थेट कायद्याचे उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत संबंधित लोकप्रतिनिधी आपले पद गमावू शकतात, हा केवळ राजकीय विषय नसून कायदेशीर पालनाचा प्रश्न असल्याचे राजकुमार टोपण्णावर यांनी म्हटले आहे.
अपात्रतेच्या टांगत्या तलवारीखाली असलेल्या नगरसेवकांनी महापालिकेच्या बैठकीत सहभागी होणे किंवा आगामी महापौर निवडणुकीत मतदान करणे यामुळे मोठी कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, अशी भीती राजकुमार टोपण्णावर यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हा मुद्दा महानगरपालिकेच्या सभेच्या अजेंड्यावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सभेत सविस्तर चर्चा करून हा विषय अधिकृत संदर्भासह राज्य सरकारकडे पाठवण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा विषय पारदर्शकता, कायदेशीरता आणि सार्वजनिक विश्वासाशी निगडित असल्याचे राजकुमार टोपण्णावर यांनी नमूद केले.
महापालिका प्रशासनाने यावर वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यात तीव्र कायदेशीर लढा दिला जाईल, असा इशारा राजकुमार टोपण्णावर यांनी दिला आहे.




