बेळगाव लाईव्ह: खानापूर–लोंढा महामार्गावर खानापूरजवळील कुप्पटगिरी क्रॉस येथील पुलावर कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात कंग्राळी बिके (ता. बेळगाव) येथील सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी खानापूर पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बिके येथील काही जण केए-२२ एम ए ६६०४ क्रमांकाच्या एरटिगा कारने दांडेली जवळील कवळे येथील शिवमंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते परत बेळगावकडे येत असताना खानापूरजवळील कुप्पटगिरी क्रॉस येथील पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार प्रथम दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर तेथे उभारण्यात आलेल्या फलकावर आदळली.
या भीषण अपघातात कारमधील नितीश हुरुडे, ओमकार पाटील, परशुराम अष्टेकर, कपिल पाटील, नागराज पाटील आणि कुणाल हेब्बाळकर (सर्व रा. कंग्राळी बिके) हे सहाही जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, त्याचवेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले आणि त्यांना तातडीने बेळगाव येथील विजय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.
सध्या सर्व जखमींवर विजय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेचा पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.



