बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची पिढीजात मालमत्ता बनावट कागदपत्रे तयार करून हडपण्याचा प्रकार सुरू आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जमीन, मालमत्ता व ब्राह्मण कुटुंबांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टच्यावतीने उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून संबंधित खात्याकडून माहिती घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये ब्राह्मण समाजाच्या सदस्यांच्या पिढीजात मालमत्ता आहेत.
त्या मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी पद्धतशीरित्या संगणमताने बनावट कागदपत्रे तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित मालमत्ता केवळ ब्राह्मण सदस्यांची आर्थिक संपत्ती नसून ती अनेक पिढ्यांपासून कुटुंबाच्या परंपरेचे, सन्मानाचे आणि उपजीविकेचे प्रतीक आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यासह इतर ठिकाणी उपनोंदणी कार्यालयांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करणे, मृत व्यक्तींना जिवंत दाखविणे, तसेच बनावट वारस निर्माण करणे यासारख्या गंभीर गैरप्रकारांच्या तक्रारी वाढत आहेत. या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या पिढीजात मालमत्तेचे बेकायदेशीर हस्तांतर करण्यात आल्याचा आरोप आहे.

कांही प्रकरणांमध्ये मूळ नोंदी लपवून त्याऐवजी बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर जमीन व्यवहार करण्यात आल्याचेही समजते. या गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणाऱ्या किंवा कायदेशीर कारवाई सुरू करणाऱ्या ब्राह्मण कुटुंबांना धमक्या दिल्या जात आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून याबाबतीत तातडीने प्रशासकीय हस्तक्षेप आवश्यक आहे. जिल्ह्यातील उप नोंदणी कार्यालयातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे. मृत व्यक्तींना जिवंत दाखविण्यासारख्या बनावट नोंदी करणाऱ्या सर्व संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई केली जावी. एकंदर सदर प्रकरणी तातडीने पारदर्शक आणि ठोस कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा तपशील बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टच्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर ब्राह्मण ट्रस्टच्यावतीने बोलताना भारत देशपांडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना अलीकडच्या काळात ब्राह्मण लोकांच्या पिढीजात जमिनी बनावट कागदपत्रे तयार करून हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून आपल्या समाजाच्या मागणीबद्दल थोडक्यात माहिती दिली. प्रसंगी ट्रस्टचे सदस्य आणि ब्राह्मण समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.



