belgaum

‘बिम्स’मध्ये परिचारकाला अमानुष मारहाण; रुग्णालय कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

0
629
bims
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील ‘बिम्स’ रुग्णालयात एका परिचारकावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कर्तव्यावर असताना रुग्णाने चावा घेणे आणि त्यानंतर नातेवाईकांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले.

सुपर स्पेशालिटी वॉर्डात पाणी आणण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका मानसिक रुग्ण तरुणीने गोंधळ घातला. तिने परिचारक बसवराज कबाडगी यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी जमाव जमवून कबाडगी यांना बेदम मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी नर्सिंग स्टाफने ‘बिम्स’च्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. साडेतीनशेहून अधिक कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत असताना, अशा घटनांमुळे कामावर येणे कठीण झाले आहे. प्रशासनाने सुरक्षा न पुरवल्यास काम करणे अशक्य असल्याची भावना खादीर मुजावर यांनी व्यक्त केली.

 belgaum
bims

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संचालक अशोककुमार शेट्टी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. तरुणीने गैरवर्तन केल्याचे आणि त्यानंतर नातेवाईकांनी अफवेवरून हल्ला केल्याचे त्यांनी मान्य केले. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांना विशेष विनंती करण्यात आल्याचे अशोककुमार शेट्टी यांनी सांगितले.

संचालकांनी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले काम पुन्हा सुरू केले आहे. मात्र, या प्रकरणातील दोषींना अटक न झाल्यास अधिक तीव्र लढा देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.