बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेळगावच्या विशेष पॉक्सो न्यायालयाने ३० वर्षे सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली असून न्यायालयाने पीडितेला आर्थिक मदतीचा आदेशही दिला आहे.
हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी येथील मंजुनाथ शंकर मोकाशी (२४) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. त्याने २३ जून २०२५ रोजी एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.
एका भाड्याच्या खोलीत तिला डांबून ठेवून तिच्यावर वारंवार सक्तीने अत्याचार केले. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश बाबू आर. बी. यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणाची सुनावणी बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष जलदगती पॉक्सो न्यायालय-१ मध्ये पार पडली. न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी एकूण ८ साक्षीदार, ७० कागदोपत्री पुरावे आणि १० जप्त केलेल्या वस्तूंच्या आधारे आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाल्याचे जाहीर केले. न्यायालयाने आरोपीला ३० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे.
न्यायालयाने पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.





