belgaum

मराठा समाजाला राजकीय ठोकर दिल्यास चोख उत्तर – श्री मंजुनाथ स्वामीजी

0
242
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकच मार्ग म्हणजे संघटनात्मक शक्ती होय. आपण सर्वांनी संघटित होऊन सध्या जे घडत आहे त्याबद्दल आपण काय केले पाहिजे, याचा विचार करून कृती केली पाहिजे. मराठा समाजाला राजकीयदृष्ट्या कोणताही पक्ष पोखरत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही आणि येत्या काळात त्याला चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा मराठा समाजाचे गुरु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी दिला.

सकल मराठा समाज बेळगावचे नेते किरण जाधव यांच्या निवासस्थानी आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेळप्रसंगी हिंदुत्वाचे प्रदर्शन करताना इतर समाजांच्या तुलनेत मराठा समाज नेहमी आघाडीवर असतो, मात्र राजकीय किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यात इतर समाज पुढे असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावर पुढे बोलताना श्री मंजुनाथ भारती स्वामीजी म्हणाले की, इतर समाज आपल्या हिंदुत्वाचा कसा राजकीय किंवा अन्य प्रकारे लाभ घेत आहेत, यावर मी काही बोलणार नाही, कारण ते त्या त्या समाजाचे स्वातंत्र्य आहे. मात्र आपण काय करायचे, हे आपण ठरवायला हवे. जातीनिहाय जनगणनेत हिंदू लिहायचे की कुणबी लिहायचे, हे समाजाने ठरवले पाहिजे. त्यानुसारच आम्ही कार्य केले आहे.

मराठा समाज हा उदात्त आणि उदार समाज असून या समाजाचा इतिहास असा आहे की धर्माविषयी, नीतीविषयी आणि सत्यतेविषयी हा समाज केव्हाही आपल्या प्राणाचे बलिदान देण्यास मागे राहिलेला नाही. त्यामुळे इतर समाजांची तुलना मी मराठा समाजाशी करूच शकत नाही. आम्ही हिंदू आहोत, सनातन आहोत, यामध्ये कोणताही संदेह नाही.

बेळगावात अल्पसंख्यांक समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत, मात्र बहुजन समाजाचा एकही आमदार नाही, याबाबत आपले काय मत आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की, आपण केवळ हिंदूंसाठीच नव्हे तर सर्वांसोबत काम केले पाहिजे. आपण हिंदू आहोत म्हणून इतर जाती-धर्मांवर टीकाटिप्पणी करणे गैर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असे आहे की त्यांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन स्वराज्याचा पाया रचला. जातीधर्माच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांनी शिक्षा केली असून त्यांच्याच आदर्शावर आम्ही कार्य करत आहोत.

मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकच मार्ग म्हणजे संघटनात्मक शक्ती आहे. एकट्याचे काहीच काम नाही. जोपर्यंत आपण सर्वजण संघटित होऊन कार्य करत नाही, तोपर्यंत आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. त्यामुळे मराठा समाजाने संघटित ताकद दाखवणे ही काळाची गरज आहे, असे स्वामीजी म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजातील नेत्यांना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी काय योजना आहे, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, विविध राजकीय पक्षांमध्ये विखुरले गेलेले मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांची सर्वप्रथम बैठक घेतली पाहिजे. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाशी देणे-घेणे नाही, आम्हाला आमच्या समाजाची काळजी आहे.

राजकीय स्वार्थासाठी आमच्या कार्यकर्त्यांचा ‘यूज अँड थ्रो’ असा वापर केला जात आहे. त्यांना एकत्र करून प्रथम त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि त्यासाठीची बैठक आम्ही लवकरच आयोजित करणार आहोत. मराठा समाजातील सर्वसामान्य लोक आमच्या सोबत आहेतच, मात्र संबंधित कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन पुढील रूपरेषा आखली जाईल.

फक्त बेळगावच नव्हे तर संपूर्ण कर्नाटकातील मराठा समाजातील लोक आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. गरज आहे ती विविध राजकीय पक्षांत आघाडीवर असलेल्या मराठा समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याची, असे त्यांनी सांगितले.

आपण समाजाच्या सुख-दुःखात सहभागी झालो, तर समाज नक्कीच आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. समाजप्रमुख व नेत्यांनी सत्तेच्या आहारी जाऊन आपल्या समाजाला विसरता कामा नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

राजकीय पक्ष आणि काही संघटना मराठा समाजातील युवकांना भरकटवण्याचा, त्यांचा केवळ वापर करण्याचा जो प्रकार करत आहेत, त्यावर आमची सूक्ष्म नजर आहे. त्या अनुषंगाने संबंधित युवकांना सोबत घेऊन पुढील वाटचाल कशी करायची, यासंदर्भात ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत.

मराठा समाजाला राजकीयदृष्ट्या कोणताही पक्ष पोखरत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही आणि त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कार्यकाळात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना झाली असून त्याचे कार्यही चांगल्या प्रकारे सुरू आहे. यापुढे विविध पक्षांत विखुरले गेलेले नेते, कार्यकर्ते तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी यांना एकत्र करून सर्वांचे विचार जाणून घेऊन पुढील कार्यपद्धती निश्चित केली जाईल, असे शेवटी श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.