बेळगाव लाईव्ह : सरकारी महिला अधिकाऱ्याला हिडन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खासगी व्हिडीओ शूट करून ब्लॅकमेल करणाऱ्या तीन तोतया पत्रकारांना माळमारुती पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली. बेळगाव शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, आरोपींनी महिला अधिकाऱ्याच्या घरातील खोलीत गुप्त कॅमेरा बसवून तिचे खासगी व्हिडीओ चित्रीत केले आणि त्याच्या आधारे खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता .
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे –समीर निसार अहमद शेख (वय 32, रा. जलाल गल्ली, गोकाक),अब्दुल रशीद मकानदार (वय 51, रा. योगींकोळ्ळ, गोकाक) आणिमोहम्मद बाळेकुंद्री (वय 43, रा. घटप्रभा, गोकाक) अशी आहेत.पोलिसांनी आरोपींकडून तीन अँड्रॉइड मोबाईल फोन, 64 जीबी पेनड्राईव्ह, सहा हिडन कॅमेरे, दोन मेमरी कार्ड्स आणि इनोव्हा कार जप्त केली आहे.

पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, आरोपींनी पीडित महिला अधिकाऱ्याकडे खासगी व्हिडीओंच्या आधारे तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच तात्काळ 50 लाख रुपये देण्याचा दबाव टाकत सतत धमक्या दिल्या जात होत्या.या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सीपीआय बी.आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली.
आरोपींनी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र पोलिसांनी कोणताही दबाव न स्वीकारता कठोर भूमिका घेत कारवाई केली.या प्रकरणामागे मोठे ब्लॅकमेल रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या टोळीने आणखी किती लोकांना फसवले आहे याचा सखोल तपास सुरू आहे असेही त्यांनी नमूद केले.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. समाजात अशा बनावट पत्रकारांच्या टोळ्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.”या घटनेमुळे बेळगाव शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





