बेळगाव लाईव्ह : बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथील आर.एस. नंबर 359 मधील सुमारे 40 एकर गायरान (सामुदायिक) जमीन PM-KUSUM योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी, बेळगाव यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार या जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यात येणार असून या कामाची अंमलबजावणी HESCOM व संबंधित विभागांच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या संदर्भात सदर गायरान जमिनीवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे निर्देश देण्यात आले असून कोणतीही शेती, लागवड किंवा अन्य वापर त्वरित बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
तसेच सदर ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. कामात अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उप आयुक्त (संपादनाधिकारी), बेळगाव विभाग यांनी केले आहे.





