बेळगाव लाईव्ह : खानापूर–अनमोड रस्त्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवर स्वार असलेले वडील गंभीर जखमी झाले असून त्यांचा १३ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी २०२६) दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास पाली गावाच्या हद्दीतील फॉरेस्ट चेकपोस्टजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, केए-२२/सी-९०८२ क्रमांकाचा ट्रक चालक जाफरसाब मरदानसाब बंकापूर (वय ५२, रा. सालाईट, गोवा) हा अनमोडकडून खानापूरच्या दिशेने भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवत होता.
पाली गावाजवळील फॉरेस्ट चेकपोस्ट परिसरात त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या जीए-०५/ई-०१४१ क्रमांकाच्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीला जोरदार धडक बसली.
या अपघातात दुचाकीस्वार संजय विठोबा देसाई (वय ४०, रा. वरलेवाडी, ता. जोयडा, जि. उत्तर कन्नड) यांच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुचाकीच्या मागील सीटवर बसलेला त्यांचा मुलगा समर्थ संजय देसाई (वय १३) याच्या डोक्याला, पोटाला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातात ट्रक चालकासही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




