belgaum

बोगस पीएचडी पदवीच्या विरोधात अभाविपचे आंदोलन

0
424
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बनावट पीएचडी पदवी संपादन करणाऱ्या शिक्षक -प्राध्यापकांसह संबंधित रॅकेट चालवणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने चांगल्या अहर्ता प्राप्त प्राध्यापक -शिक्षकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कार्यालय समोर छेडण्यात आलेल्या आंदोलनामध्ये शहरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात अभावीपचे भगवे ध्वज घेतलेल्या या सर्वांनी जोरदार निदर्शने करून बनावट पीएचडी पदव्या आणि राज्य सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. निदर्शनानंतर अभाविप नेत्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते राज्य शासनाकडे पाठवण्याद्वारे आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

आंदोलन स्थळी आपल्या संघटनेच्या मागणीबद्दल बेळगाव लाईव्हला माहिती देताना अभाविप बेळगाव प्रांत पदाधिकारी दर्शन वडाळी म्हणाला की, सध्या बनावट, बोगस पीएचडी पदवीच्या बाबतीत जो गोंधळ सुरू आहे त्याचा आम्ही राज्यभरात निषेध करत आहोत. पीएचडी पदवी संपादन करण्यासाठी एखाद्याला सहा वर्षे कष्ट घ्यावे लागतात. तथापि आता पीएचडी पदवीचा बाजार मांडण्यात आला असून अभ्यास न करता पैसे दिले की ही पदवी मिळत आहे.

या पद्धतीने पीएचडी पदवी संपादन करणारे त्यांना स्वतःलाच विषयाचा नीट अभ्यास नसल्यामुळे पुढे जाऊन शिक्षक -प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना काय शिकवणार? अशा प्राध्यापकांकडून बुद्धिवान भावी पिढी कशी घडणार? चांगल्या ज्ञानाअभावी भावी विद्यार्थी आणि आपले राज्य देखील प्रगतीत मागे पडणार आहे. तेंव्हा जे शिक्षक -प्राध्यापक बनावट पीएचडी पदवी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, त्यांची त्यांच्या पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी.

तसेच जे कोण हे बनावट पीएचडी पदवीचे रॅकेट चालवत आहेत त्यांच्यावर देखील कठोर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे, असे दर्शन वडाळी याने शेवटी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.